
सामना ऑनलाईन, बीड
रस्त्याने पायी जाणाऱ्या मुलीचा पाठलाग करत तिच्याकडे एकटक लावून पाहत तिला डोळा मारल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षाची शिक्षा व पाचशे रूपये दंड ठोठावण्यात आला.
रायमोहा येथील रस्त्यावरून २० एप्रिल २०१८ रोजी एक मुलगी पायी जात होती. या मुलीचा पाठलाग शिरूर तालुक्यातील टाकळगाव येथील पुरूषोत्तम ज्ञानदेव वीर याने केला. सदरील मुलीकडे त्याने एकटक पाहून तिला डोळा मारला. या प्रकरणी मुलीने पाटोदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी पुरूषोत्तम वीर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अरूण डोंगरे यांनी करून आरोपीविरोधात जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांच्यासमोर झाली. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने सात साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. तपासणीमध्ये आरोपीस तीन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व पाचशे रूपये दंड ठोठावण्यात आला. पाचशे रूपये दंड न भरल्यास एक महिन्याची सक्त मजुरी देण्याची शिक्षा न्यायालयाने सुनावली. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी एपीआय इंगळे यांनी सहकार्य केले. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अॅड.अनिल धसे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड.संगिता धसे यांनी सहकार्य केले.

























































