
बदलापुरात आज सकाळी थरारक घटना घडली. ब्रेक फेल झाल्याने गुजरातहून लाद्या घेऊन आलेल्या भरधाव ट्रकने शहरात हाहाकार उडवत चार गाड्यांना चिरडले. या भयंकर घटनेत दुचाकीवरील महिला ठार झाली असून अन्य वाहनांमधील सात प्रवासी जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान नियंत्रण सुटलेल्या ट्रकमधून उडी मारून चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धडकी भरवणारी ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
ब्रेक फेल झालेला ट्रक गुजरातहून लाद्या घेऊन येत होता. मुरबाड येथे जात असतानाच या ट्रकचे बदलापूर शहरातील वालिवली येथे उतारावर अचानक ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झाल्याचे समजताच चालकाने गाडीतून उडी मारून पोबारा केला. त्यामुळे अनियंत्रित झालेल्या या सुसाट ट्रकने रिक्षा, दुचाकी, दोन कार अशा चार वाहनांना एकापाठोपाठ एक उडवले. हा सर्व भयंकर प्रकार पाहून रस्त्यावरून चालणाऱ्या अनेकांनी आरडाओरडा करत पळ काढला. त्यामुळे मोठी दुघर्टना टळली. मात्र ट्रकखाली કુટનીટ आल्याने लालतीदेवी प्रजापती या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
एक तास मार्ग वाहतुकीसाठी बंद
रिक्षाला धडक दिल्याने तिचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. दुचाकीला ठोकर देऊन दोन कारवर ट्रक आदळला. एका खासगी गृहसंकुलाच्या पुढे जाऊन ट्रक थांबला. तेव्हा अनेकांचा जीव भांड्यात पडला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर एक तास हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
सत्संगला जाण्याआधीच काळाचा घाला
लालतीदेवी या पती राम प्रजापती यांच्यासह दुचाकीवरून सत्संगला जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील लालतीदेवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. सत्संगला जाण्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. पती राम प्रजापती यांचीही प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.