
मुलांच्या शाळेच्या सुट्टीचे वेळापत्रक ठरले की लगेच सुट्टीत फिरायला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. कुणी देशात फिरायचे नियोजन करतो, तर काहीजण थेट परदेशवारीचा बेत आखतात. अनेक कुटुंबियांची सुट्टीत सहल ठरलेली आहे. अशा सुट्टीतील सहलींचे प्लॅनिंग करण्यात महिला आघाडीवर असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. हिंदुस्थानातील तब्बल 72 टक्के सहलींचे नियोजन महिलांकडून केले जात असल्याचा निष्कर्ष ‘थ्रिलोफिलिया’ या एआय-संचालित मल्टी-डे टूर्स प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. देशातील निवडक घरांतील कुटुंबियांचा अभ्यास करुन हा महत्वपूर्ण बदल अधोरेखित करण्यात आला आहे. सहलीसाठी राजस्थान, केरळ, गोव्याला जास्त पसंती असते.
हिंदुस्थानी महिला केवळ खर्चामध्येच काटकसर करतात, असे नव्हे तर बहुतांश कौटुंबिक सुट्ट्यांमधील नियोजन आणि सहलींचे निर्णय घेण्यात नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे देशातील प्रवासाचे बदलते स्वरूप समोर येत आहे. महिलांच्या आवडीनिवडी आणि त्यांच्या सवयीचा ट्रॅव्हल्स इंडस्ट्रीवर अधिक प्रभाव दिसून येत असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. सहलींच्या नियोजनामध्ये अगदी प्रेक्षणीय स्थळांच्या निवडीपासून ते बजेटमध्ये योग्य ते बचत करण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये महिलांचा प्रभाव दिसून आला आहे. महिला सुट्टीतील सहली लवकर बुक करतात. सरासरी नऊ दिवस आधी सहलींचे बुकींग केले जाते. त्यांनी ठरवलेल्या सहलींचा प्लॅन रद्द होण्याचे प्रमाण फार कमी आहे. सहलीला जाण्यापूर्वी महिला त्या प्रेक्षणीय स्थळासंबंधी आधीची लोकांची मते तसेच अधिकाधिक फोटो तपासतात. ते फोटो कुटुंब किंवा मित्रांच्या गटांमध्ये प्रसारित करुन नंतरच सहलीचा अंतिम निर्णय घेतात,
देशांतर्गत प्रवास करताना महिलांची राजस्थान आणि केरळसारख्या ठिकाणांना पहिली पसंती असते. त्यापाठोपाठ गोवा तिसरे सर्वात लोकप्रिय ठिकाण ठरले आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर बाली, दुबई, अबूधाबी, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनामसारख्या ठिकाणांना प्राधान्य दिले जात आहे.






























































