यवतमाळ जिल्ह्यात वाघाने घेतला १२ वा नरबळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव आणि पांढरकवडा तालुक्यांत वाघाची दहशत सुरुच आहे. गेल्या वर्षभरातच ११ माणसे या वाघाची भक्ष्य ठरली असून आता त्याने १२ नरबळी घेतला आहे. गुलाब मोकाशे असं या व्यक्तीचं नाव आहे.

शनिवारी रात्रीपासून राळेगांव तालुक्यातील वेडशी शिवारातील गुलाब मोकाशे हा बेपत्ता होता. आज सकाळी वाघाने खाल्लेला त्याचा मृतदेह सापडला. हा वाघाचा १२ वा बळी ठरला. आत्तापर्यंत या वाघाने या भागातील अनेक ढोरांना आपले भध्य केले आहे. वनविभागाने या वाघाला पकडायला शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा हा वाघ त्यांच्या हाती लागलेला नाही.

मोकाशे यांचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी अद्याप वनविभागाचा कोणीही अधिकारी पोहोचलेला नाही. सतत घडणाऱ्या हल्ल्याच्या घटनांनी या परिसरातील नागरिक दहशतीत वावरत आहेत. घटनास्थळी नागरिकांनी मोठा जमाव केला असून जोपर्यंत वनविभाग या वाघाचा बंदोबस्त करत नाही तो पर्यंत मृतदेह हटवणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. यामुळे तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे.