
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील चोरगेवाडीत सापळ्यात अडकलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने सुखरुप बाहेर काढले. चोरगेवाडी नदीकिनारी लावलेल्या सापळ्यात रात्रीच्या वेळी बिबट्या अडकला. गुरुवारी सकाळी ग्रामस्थांना सापळ्यात अडकलेला बिबट्या दिसला. त्यानंतर गावच्या उपसरपंचांनी वनविभागाला बिबट्या सापळ्यात अडकल्याची माहिती दिली.वनविभागाचे पथक त्याठिकाणी हजर झाले. सुमारे वीस मिनिटात बिबट्याला सापळ्यातून बाहेर काढून पिंजऱ्यात ठेवण्यात आले. ही कामगिरी वनपाल लक्ष्मण गुरव,राजर्षी कीर,उपरे,पाटील,वनरक्षक मिताली कुबल,परमेश्वर डोईफोडे,गावडे,कुंभार, गुढे यांनी केली.
























































