राष्ट्रवादीची झोप उडवणारा कैदी तिहार जेलमध्ये बसलाय, नरेंद्र मोदी यांची सनसनाटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नागपूर

आजकाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना रात्रीची झोप येत नाही. कारण त्यांची झोप उडवणारा कैदी दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे, असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदियाच्या जाहीर सभेत केला. हा कैदी तोंड उघडेल आणि आपणही तिहार जेलमध्ये जाऊ अशी भीती या नेत्यांना वाटत आहे, असा टोलाही मोदी यांनी यावेळी लगावला. त्यामुळे तिहारमधला तो कैदी कोण आणि त्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी काय संबंध आहे, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

गोंदियामध्ये मोदी यांनी भाजप-शिवसेना युती उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, शिवसेनेचे संपर्क नेते डॉ. दीपक सांवत यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या भाषणाची मराठीत सुरुवात करीत उपस्थित नागरिकांना आपण सर्व कसे आहात असे मराठीत विचारून मोदींनी सुरुवातीलाच सभा जिंकली.   संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी गुढीपाडवा या नववर्षाच्या शुभेच्छा देत या निमित्ताने महागटबंधन नावाची महामिलावट पूर्णतः साफ करा असे आवाहन केले.

पवार देश तोडण्याच्या कटात का सहभागी

आपल्या भाषणात मोदींनी काँगेसच्या जाहीरनाम्याची चांगलीच चिरफाड केली. काँग्रेसची सत्ता आली तर देशद्रोहाचे खटले भरले जाणार नाहीत हे तुम्हाला मान्य आहे काय असा सवाल करीत असे घडले तर देशाची काय अवस्था होईल याचा विचार करा असेही ते म्हणाले. शरद पवारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे. मग देश तोडण्याच्या या कटात त्यांनी का सहभागी व्हावे असा सवाल मोदी यांनी केला.

मतदार सर्व लक्षात ठेवतो

सध्या दिल्लीमध्ये वातानुकुलित खोल्यांमध्ये बसून काही लोक नव्यानव्या कथा प्रसारित करीत आहेत. आता हे विद्वान म्हणतात की बालाकोटचा हवाई हल्ला होऊन एक महिना लोटला आहे, तेव्हा मतदार आता विसरले असतील. मात्र मतदार सर्व काही लक्षात ठेवतो. बालाकोटचा हवाई हल्लाच काय पण या देशातील मतदारांनी 62चे चीनचे युद्धही पक्के लक्षात ठेवले आहे असा टोला मोदी यांनी यावेळी लगावला.

विरोधकांचा कॅप्टन केव्हाच पळून गेला

येत्या निवडणुकीत भंडारा-गोंदियातील विरोधकांचा कॅप्टन आधिच पळून गेला आहे. उपकप्तानही माघार घेऊन घरी बसला आहे. तर तिसरा खेळाडू नाना पटोले आपला मतदारसंघ सोडून नागपुरात जमानत वाचविण्यासाठी धडपडतो आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच लगावला.