TikTok ला ‘या’ देशी अॅपचा जबरदस्त झटका, टॉप चार्टमध्ये मागे टाकत दुसरा नंबर पटकावला

3051

टिकटॉक (TikTok) या चायनीज अॅपची चर्चा सध्या जोरात आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे हिंदुस्थानमध्ये टिकटॉक अॅप अनइंस्टोल करण्याची मोहीम चालवली गेली. त्यामुळे टिकटॉकचे रेटिंगही कमी झाले. मध्यंतरी टिकटॉक आणि युट्युब असाही सामना रंगला. तसेच टिकटॉकवर ऍसिड हल्ला आणि बलात्काराचे समर्थन करणारे व्हिडीओ आढळल्याने नागरिकांनी टिकटॉकची रेटिंग घटवून हे अॅप देशातून बॅन करण्याची मागणी केली. अशातच टिकटॉकला मोठा झटका बसला आहे.

टिकटॉकला एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याने बनवलेल्या अॅपने मागे टाकले आहे. मित्रो (Mitro) असे या अॅपचे नाव आहे. या अॅपने गुगल प्ले स्टोअरवरील टॉप चार्टमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, हे अॅप टिकटॉककॅगे क्लोन व्हर्जन आहे. यात टिकटॉकप्रमाणेच अनेक फिचर्स देण्यात आले आहे. एका महिन्यापूर्वी आयआयटी रुरकीचा 31 वर्षीय विद्यार्थी शिवांक अग्रवालने (IIT-Roorkee alumnus Shivank Agarwal) हे अॅप प्ले स्टोअरवर टाकले होते. आतापर्यंत या अॅपला 50 लाखपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केले आहे.

दरम्यान, हे अॅप नवीन असल्याने अर्थातच यामध्ये सध्या काही बग्ज आहेत. यात लॉगईन करताना अडचण येणे, ऑडिओ अॅड करण्याचे लिमिटेड पर्याय, अशा काही गोष्टींचा समावेश आहे, मात्र असे असले तरी हिंदुस्थानी नागरिक या अॅपला चांगले रेटिंग देत आहेत. येत्या काळात बग्ज हटवण्यात यश आले तर हे अॅप टिकटॉकची जागा घेऊ शकते. त्यामुळे आतापासूनच टिकटॉक देशी पर्याय मिळाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या