
लांबसडक केसांसाठी अनेकजण वेगवेगळे महागडे शॅम्पू, तेल व सौंदर्यप्रसाधनं वापरतात. या बाहेरील पोषणासोबतच काही खाद्यपदार्थही केसांच्या वाढीसाठी उपयोगी असतात. त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी चांगला आहार घेणंही तितकच आवश्यक असतं. आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबाबत सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने केसांच्या वाढीसाठी फायदा होतो.
पालक –
केसांची वाढ होण्यासाठी पालक अत्यंत फायदेशीर आहे . यामध्ये जास्त प्रमाणात जीवनसत्व ‘अ’ , ‘क’ आणि लोह असते. जे केसांच्या वाढीसाठी पोषक आहे. ‘अ’ जीवनसत्वामुळे केसाच्या त्वचेतील आर्द्रता टिकून राहते. तसेच आवश्यक लोह असल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. त्यामुळे आहारात जास्तीत जास्त पालकाचा समावेश असावा.
सोयाबीन – सोयाबीनचा आहारात समावेश करणे केसांसाठी उपयुक्त आहे. त्यात असलेले वेगवेगळे घटक केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत.
गाजर – गाजर हे डोळ्यांबरोबरच केसांसाठीही चांगले आहे. गाजर खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते आणि त्याने केसांना जीवनसत्व ‘अ’ मिळतं जे केसांसाठी आवश्यक असतं.
रताळे – लांबसडक केसांसाठी रताळेही उपयुक्त मानले जाते. त्यात बीटा -कॅरेटीन आणि जीवनसत्व ‘अ’ ची भरपूर मात्रा असते. केसांच्या वाढीसाठी ते गुणकारी मानले जाते. डोक्याची त्वचा निरोगी राहून कोंडा होत नाही.
आवळा – आवळा आरोग्याबरोबरच केसांसाठीही उपयुक्त आहे, आवळ्यात असलेले जीवनसत्व ‘ई’ हे केस गळणे आणि तुटण्याच्या समस्येपासून दूर ठेवते. त्यामुळे आवळा खाल्ल्याने केस काळे, लांब आणि घनदाट राहण्यास मदत होते.
अंड – केसांच्या आरोग्यासाठी प्रथिनयुक्त आहार उपयुक्त आहे. अंड्यामध्ये प्रथिने आणि बायोटीन हे दोन घटक असतात. त्याने केसांचे मुळापासून पोषण होते. म्हणून केसांच्या आरोग्यासाठी अंडे खाणे केसांसाठी उपयुक्त मानले जाते.
पेरू – नियमित पेरू खाणऱ्यांमध्ये लोहाची कमतरता भासत नाही. पेरूमध्ये जीवनसत्व ‘क’ असल्याने केस मजबूत ठेवण्यासाठी त्याचा फायदा होतो.


























































