
मधुमेहाला राम राम
- मधुमेही रुग्णांनी सकाळी लवकर उठावे. प्रातर्विधी उरकून 100 मि. ली. कोमट पाणी प्यावे. त्यानंतर अर्ध्या तासात किमान तीन किलोमीटर अंतर चालावे. चालून घरी आल्यानंतर पाच मिनिटे शवासन करावे. यामुळे थकवा दूर होतो.
- त्यानंतर किमान पाच मिनिटे दीर्घश्वसन किंवा अनुलोम-विलोम प्राणायाम करावा.
- सकाळी गाईचे ग्लासभर कोमट दूध चिमूटभर सुंठ-हळदीसह प्यावे. यामुळे शरीराची झीज भरून निघते. गाईचे दूध हे पूर्णान्न आहे. चहा शक्यतो टाळावा, न जमल्यास कमी साखरेचा चहा दिवसातून एकदा घ्यावा .
- कष्टाची कामे करणाऱ्यांनीच न्याहारी करावी. इतरांनी दुपारी अकराच्या सुमारास जेवावे.
- न्याहारीसाठी सहज पचणारा, ताजा, ऋतु आणि स्वतःच्या प्रकृतीला योग्य असा आहार घ्यावा. त्यात दलिया, मुगाचे धिरडे, उपमा, सांजा, फळे, ओट्स, भाजीपोळी इत्यादी पदार्थांचा समावेश असावा. न्याहारी आणि दुपारच्या जेवणात किमान चार तास अंतर असावे.
- मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी आपण सतत क्रियाशील असणे गरजेचे आहे. त्याकरिता मन सतत कामात गुंतवावे. दुपारी जेवण निवांत जागी, जास्त न बोलता आणि सावकाश करावे.
- प्रसन्न मनःस्थितीत सहज पचणारे, ताजे अन्न खाल्ल्याने आरोग्य लाभते. भूक असेल तरच जेवावे. अन्न नेहमी चावून चावून खावे.




























































