
>> शमिका कुलकर्णी (आहारतज्ञ)
कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्वच जण घरच्या घरी जेवण बनवत असले तरी आता बरीचशी रेस्टॉरंटस् होम डिलिव्हरीसाठी उघडलेली आहेतच. शिवाय आता सोमवारपासून ही रेस्टॉरंटस् सुरूही होणार आहेत. त्याचबरोबर लॉकडाऊनमध्ये घरीही विविध रेसिपीज करून पाहिल्यामुळे अनेकांचे वजनही वाढले आहे. मग आता यात बाहेरचे खाल्ल्यावर वजन वाढेल की काय, अशी प्रत्येकाला भीतीही असते. मग अशावेळी नक्की काय मागवायचे, काय खाऊन वजनावर नियंत्रण ठेवता येईल असा प्रश्न अनेकांना पडत असतो.
तर रेस्टॉरंटस्मधून नक्की काय मागवायचे याबद्दल काही टिप्स –
– बाहेरून कोणतेही पदार्थ मागवताना स्वच्छ व चांगल्या ठिकाणाहून मागवावे.
– शक्य असल्यास बाहेरून मागवताना चांगले शिजवलेले पदार्थ मागवावे. त्यामुळे सॅलडस् किंवा फळांचे रस मागवणे टाळा.
– तंदूर, ग्रिलड किंवा रोस्टेड पदार्थ जसे तंदूर पनीर, चिकन किंवा मासे असे पर्याय मागवावे.
– चाटचे पदार्थ बाहेरून मागवणे टाळा व त्यापेक्षा भेळपुरी, स्प्राऊट चाट, कॉर्न चाट, अळू टिक्की चाटसारखे पदार्थ घरी बनवून खाणे योग्य आहे.
– पिझ्झा किंवा पास्ता मागवल्यास ते पुन्हा गरम करून खावेत.
– इडली, डोसे, उत्तपम, संभारसारखे पदार्थ चविष्ट व हेल्थी आहेत.
– बाहेरची पेय शक्य असेल तर टाळावी. जसे कोल्ड कॉफी, स्मूथी, मिल्कशेक, फळांचे रस.
– तळलेले पदार्थ किंवा गोड पदार्थ घेणे योग्य नाही.
अशा प्रकारे बाहेरून कमीत कमी मागवून किंवा मागवले तर वरील टिप्स लक्षात ठेवून मागवावे. आपल्याला आरोग्य जपणे व वजन कमी करणे सोपे जाईल. कारण सध्या स्वतःची व कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रथम महत्त्वाचे आहे.




























































