
>> डॉ. अविनाश भोंडवे
शरीरात एखाद्या घटकाची कमतरता असल्यास शरीर त्याची लक्षणे जरूर दर्शवते. हीच बाब शरीराचा थकवा आणि हवी असणारी विश्रांती याबाबत लागू होते. व्यग्र जीवनशैलीमुळे म्हणा किंवा अपुऱया झोपेमुळे थकवा आणि सुस्तपणा जाणवतो. आपले शरीर व मन उत्साही राहण्यासाठी आणि शरीराची कार्यक्षमता वाढण्यासाठी आहारविहाराबाबत काही नियम पाळणे गरजेचे आहे.
नाच नाचुनी अति मी दमले। थकले रे नंदलाला।।
मराठीचे वाल्मीकी समजल्या जाणाऱया गदिमांच्या एका चित्रपट गीतातील या ओळी आहेत. आजच्या दैनंदिन पळापळीत, ऑफिसमधल्या कामानिमित्त दिवसभर अक्षरशः इकडे तिकडे नाचून घरी येताना प्रत्येक व्यक्तीच्या मनात याच भावना येतात – थकलो मी…!
या शारीरिक आणि मानसिक थकव्याची काही कारणे आपण मागील लेखात पाहिली. त्याव्यतिरिक्तही अनेक कारणे या दमण्यामागे असतात.
1. अन्न पदार्थांची अॅलर्जी – एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या पदार्थाचे वावडे असेल तर तो पदार्थ सेवनात आल्यावर त्याला अंगाला खाज सुटणे, पुरळ उठणे, पोट दुखून उलटय़ा जुलाब होणे अशी लक्षणे सगळ्यांनाच माहिती असतात, पण काही व्यक्तींना ठरावीक अन्न पदार्थ आहारात आल्यावर खूप थकवा येतो. यात गव्हातील ग्लुटेन, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, सोयाबीन आणि त्यापासून बनलेले पदार्थ यांचा समावेश होतो. अगदी तुरळक व्यक्तींमध्ये आढळणारा हा दोष अॅलर्जीच्या तपासण्या केल्यास लक्षात येतो. या व्यक्तींना या वावडे असलेल्या गोष्टी खाणे कायमस्वरूपी टाळावे लागते.
2. अपुरा आहार – आपल्या शरीराला दैनंदिन शारीरिक हालचाली आणि शरीरांतर्गत क्रियांसाठी ठरावीक उष्मांकांची गरज असते. प्रत्येकाचे वय,वजन, उंची, शारीरिक श्रम याप्रमाणे ते बदलत राहते. स्त्रियांमध्ये गर्भवती अवस्थेत ही गरज अधिक असते. सर्वसाधारपणे 1200 ते 1800 पॅलरीज एवढी गरज 16 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला असते. हे सर्व उष्मांक रोजच्या आहारातूनच मिळावे लागतात.
धार्मिक भावनेतून केले जाणारे उपास-तापास, वजन कमी करण्याच्या प्रबळ इच्छेने केलेले अशास्त्रीय आहार नियोजन, भ्रामक कल्पना बाळगून वजन कमी करण्यासाठी प्रचलित झालेली फॅड डाएट्स, कामामुळे खाण्यापिण्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अनेकांच्या आहारात उष्मांकांची कमतरता राहते. याचा परिणाम म्हणून शरीराला लागणाऱया किमान ऊर्जेची गरज भागविली न गेल्याने या व्यक्तींना कमालीचा थकवा जाणवत राहतो.
अशा व्यक्तींनी असा अपुरा आहार घेण्याऐवजी आवश्यक त्या उष्मांकांची गरज भागवून व्यायामाद्वारे उष्मांक खर्च करणे आवश्यक असते. त्यामुळे उत्साह वाढतोच; पण शरीराचे आरोग्य धोक्यात येत नाही.
3. अपुरी प्रथिने – ज्याप्रमाणे शारीरिक ऊर्जेकरिता आपल्याला पिष्ठमय पदार्थ आणि स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या वाढीसाठी, शरीरातील झीज भरून काढण्यासाठी आणि असंख्य शरीरांतर्गत क्रियांसाठी आपल्याला प्रथिने, जीवनसत्त्वे यांची गरज असते. त्यासाठी आपला आहार हा सर्व अन्न घटकांनी समतोल असावा लागतो. यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे कमी पडल्यास शारीरिक शक्ती कमी भासून थोडय़ा कामाने थकवा जाणवतो.
द.कोरियामधील एका वैद्यकीय सर्वेक्षणात तेथील विद्यार्थ्यांना दिवसातून दोनदा मासे, अंडी, मटण आणि कडधान्यांच्या स्वरूपात जास्त प्रमाणात प्रथिने दिल्यावर त्यांच्यातील थकव्याचे प्रमाण हे पदार्थ न दिलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा खूपच कमी झाले असे सिद्ध करण्यात आले. वेटलिफ्टरमध्ये केलेल्या एका प्रयोगातसुद्धा हे सिद्ध करण्यात आले आहे.
4. पाणी कमी पिणे – आपल्या शरीरातील अनेक चयापचय क्रिया, रासायनिक क्रिया या पाण्यावर अवलंबून असतात. रोज मलमूत्रविसर्जन, श्वासोच्छ्वास, घाम यातून आपल्या शरीरातील पाणी आणि क्षार उत्सर्जित होत असतात. त्यामुळे आपण रोज सुमारे 3 लिटर पाणी आणि द्रव पदार्थ प्राशन करणे आवश्यक असते. आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण 10 टक्क्यांनी जरी कमी झाले तरी आपल्याला कमालीचा थकवा जाणवतो. त्याहून जास्त प्रमाणात पाणी आणि त्याबरोबर क्षार कमी झाल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो. या सर्वांचा परिणाम कमालीचे गळून गेल्यासारखे वाटते आणि खूप थकवा येतो.
हा थकवा टाळण्यासाठी पाणी, नैसर्गिक फळांचे रस आणि सरबते, शहाळे, लिंबूपाणी, कोकम सरबत, पन्हे, ताक अशा गोष्टींचा नियमित समावेश होणे आवश्यक असते.
5. ऊर्जात्मक पेये – सर्वसाधारणपणे बौद्धिक कामांनी थकवा आला तर चहा-कॉफी पिणे हा एक नित्याचा रिवाज असतो. आजकाल अनेक तरुणांमध्ये कोला पेये, काही एनर्जी ड्रिंक्स घेण्याकडेदेखील कल वाढतो आहे. यामध्ये असलेली उत्तेजक द्रव्ये झोप उडवतात. त्यांच्या सेवनाने मेंदूचा सावधपणा आणि तल्लखपणा काही काळासाठी वाढतो. मात्र त्यानंतर दुसऱया दिवशी कमालीची झोप आणि थकवा येऊ लागतो. साधारणपणे चहा-कॉफीच्या एका कपामध्ये 50 ते 75 ग्रॅम पॅफिन असते. जाहिरातींमधून युवकांच्या गळी उतरवल्या जाणाऱया आजकालच्या नव्या पद्धतीचे प्रमाण मात्र वाढत जाते. खूप उकळलेल्या आणि स्ट्रॉंग कॉफीत ते 150 ग्रॅम इतके जास्त असू शकते. एनर्जी ड्रिंक्समध्ये तर ते 350 ग्रॅमपर्यंत असते.
एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जेव्हा पॅफिन रक्तात मिसळले जाते, त्याचा मेंदूवर आणि हृदयावर कमालीचा उत्तेजक परिणाम होतो. पण त्याचे ‘आफ्टर इफेक्ट्स’ मात्र त्याच मेंदूला आणि हृदयाला गलितगात्र करतात. अशा पेयांच्या नित्य सेवनाने उत्साहाचे परिणाम कमी होऊन असह्य थकव्याचे परिणाम शरीरावर जाणवत राहतात.
6. ताणतणाव – जीवनशैलीतील असह्य ताणतणाव हेदेखील थकवा निर्माण होण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरू पाहते आहे. ताणतणावांमुळे मानसिक एकाग्रता आणि शांतता ढळते, विचारांचा गोंधळ उडतो, चुका होतात, कामाचा उरक कमी होतो. याचा परिणाम म्हणून शरीर जरी थकलेले नसले तरी कमालीचा मानसिक थकवा त्या व्यक्तींना जाणवू लागतो.
विविध प्रकारच्या ध्यानधारणा किंवा मेडिटेशन, रिलॅक्सेशन, योग यांनी ताणतणाव आणि त्यामुळे होणारे थकव्यासारखे अनेक दुष्परिणाम कमी होतात. आपल्याला असलेले छंद जोपासणे, मित्रमंडळी जमवून निखळ गप्पा मारणे, प्रवास, वाचन, अभिजात कलांचा रसग्रहणात्मक अनुभव यांनीदेखील थकव्याची भावना दूर पळू शकते.
आजच्या जीवनशैलीत प्रत्येकासमोर आभाळाएवढी आव्हाने उभी आहेत. त्यांचा सामना रात्रंदिन करण्यासाठी शरीराला, बुद्धीला आणि मनाला सतत ताजेतवाने राहिलाच पाहिजे. यासाठी आपल्या आहार-विहार आणि रोजच्या जीवनशैलीत हे बदल करून आचरणात आणले पाहिजेत.




























































