तिरुपती मंदिर देवस्थानचा अजब कारभार! चर्चमधील प्रार्थनेला उपस्थित राहिल्यामुळे एका अधिकाऱ्याचे निलंबन

तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) ने एका वरिष्ठ अधिकाऱ्याला, ख्रिश्चन धर्माशी संबंधित कार्यात सहभागी असल्याबद्दल निलंबित केले आहे. सहाय्यक कार्यकारी अधिकारी ए. राजशेखर बाबू यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. देवस्थानने त्यांच्यावर दर रविवारी त्यांच्या मूळ गावी पुत्तूर (जिल्हा तिरुपती) येथील चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी ते जात असल्याचा आरोप केला आहे.

टीटीडीने म्हटले आहे की, राजशेखर बाबू यांचे वर्तन संस्थेच्या आचारसंहितेविरुद्ध आहे. टीटीडी च्या म्हणण्यानुसार, हिंदू धार्मिक ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना विशेष नियमांचे पालन करावे लागते. टीटीडीने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, मिळालेल्या माहितीनुसार ए. राजशेखर बाबू दर रविवारी त्यांच्या गावी पुत्तूर येथील चर्चमध्ये जाऊना प्रार्थना करतात. हे टीटीडीच्या आचारसंहितेचे उल्लंघन आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीटीडी कर्मचारी ए. राजशेखर बाबू यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते चर्चमध्ये प्रार्थना करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, टीटीडीने त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे. संस्थेने म्हटले आहे की, धार्मिक बाबींमध्ये कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा किंवा नियमांविरुद्ध वर्तन सहन केले जाणार नाही. बाबूंचे हे वर्तन टीटीडीच्या नियम आणि शिस्तीविरुद्ध आहे.

टीटीडीने अशी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशाच प्रकारच्या आरोपांवरून सुमारे 18 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. संस्थेचे म्हणणे आहे की, त्यांचे कर्मचारी सार्वजनिकरित्या इतर कोणत्याही धर्माच्या प्रचारात किंवा उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.