दुकानात डांबून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आंबिवलीतील घटना; नराधमाला बेड्या

टिटवाळ्यात नशेचे इंजेक्शन देऊन 21 वर्षीय तरुणीवर सलग 10 दिवस सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता कल्याणमध्ये नदीकिनारी शूटिंग पाहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला दुकानात डांबून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कल्याणजवळील आंबिवली परिसरात घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी नराधम गणेश म्हात्रे याला बेड्या ठोकल्या.

आंबिवली परिसरात पीडित अकरा वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबासह राहते. तिचे आई-वडील भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. 5 मे रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही मुलगी मैत्रिणीच्या घरी जाते असे सांगून घराबाहेर पडली. सायंकाळपर्यंत ती परत आली नाही. मुलीच्या कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. मात्र तिचा थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ही मुलगी त्याच परिसरात आढळून आली. कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर भयंकर घटना उघडकीस आली.

दुकानात ढकलून शटर बंद केले
आंबिवली येथील नदीकिनारी शूटिंग सुरू होती. ही शूटिंग पाहण्यासाठी पीडित मुलगी त्या ठिकाणी गेली होती. या नदीच्या परिसरातच गणेश म्हात्रे या नराधमाचे किराणा मालाचे दुकान होते. गणेश याची नजर या अल्पवयीन मुलीवर पडली. त्याने तिला दुकानात बोलावून जबरदस्तीने दुकानात थांबण्यास सांगितले. मात्र अल्पवयीन मुलीने विरोध करताच तिला दुकानात ढकलून दुकानाचे शटर बंद करून नराधमाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. हा सर्व प्रकार ऐकताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.