
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. वंदे मातरम्, मनरेगा, एसआयआर यासारख्या मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. कामकाज सुरू असताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकही उडताना दिसत आहे. बुधवारी मनरेगाच्या मुद्द्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद परिसरामध्ये आंदोलन केले. यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मकर द्वारासमोर आमनेसामने आले. यात कल्याण बॅनर्जी गडकरींना एक तरी घुसखोर सापडला का? असा सवाल करताना दिसत आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संसदेच्या मकर द्वाराजवळून जात असताना तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी त्यांना रोखतात आणि घुसखोरांबाबत प्रश्न विचारतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 1 कोटी घुसखोर असल्याचा उल्लेख केला होता. त्यांना बाहेर फेकण्याच्याही तयारी सुरू होती. परंतु पश्चिम बंगालमध्ये एक तरी घुसखोर सापडला का? असा सवाल कल्याण बॅनर्जी नितीन गडकरी यांनी मजेशीर अंदाजात विचारतात.
कल्याण बॅनर्जी यांच्या प्रश्नाला नितीन गडकरी हसत हसत उत्तर देतात. तुम्हाला जबाबदारी देण्यात येते, असे गडकरी म्हणतात. यानंतर कल्याण बॅनर्जी नितीन गडकरी यांच्या कानात काहीतरी पुटपुटतात आणि दोघेही जोरजारात हसायला लागतात.
#WATCH | Delhi | Friendly interaction between TMC MP Kalyan Banerjee and Union Minister Nitin Gadkari inside Parliament premises pic.twitter.com/OZQVcTMWpb
— ANI (@ANI) December 17, 2025
यानंतर कल्याण बॅनर्जी आणखी एक विधान करतात. तुम्ही एवढ्या गाड्यांचे काय करणार, एक-दोन आमच्यासारख्या लोकांसाठीही पाठवून द्या, असे कल्याण बॅनर्जी म्हणतात. यावरही गडकरी मोकळेपणाने हसतात आणि गाडीत बसतात.
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून ४५,००० मतदारांची नावे वगळण्यात आली; TMC घरोघरी जाऊन पडताळणी करणार


























































