बंगालमधील ईडीच्या धाडीचे दिल्लीत पडसाद; गृहमंत्रालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या TMC च्या 8 खासदारांना अटक, पोलिसांनी फरफटत नेलं

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय सल्लागार कंपनी आयपीएसीचे कार्यालय तसेच कंपनीचे संचालक प्रतीक जैन यांच्या निवासस्थानावर गुरुवारी ईडीने धाड टाकली. ‘आयपीएसी’कडे तृणमूल काँग्रेसच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. या धाडीचे पडसाद शुक्रवारी राजधानी दिल्लीत उमटले. ईडीच्या कारवाईविरोधात खासदार डेरेक ओ ब्रायन आणि महुआ मोईत्रा यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी गृहमंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी सर्व खासदारांना ताब्यात घेतले आणि अक्षरश: फरफटत पोलीस स्थानकात नेले.

शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास तृणमूल काँग्रेसचे आठ खासदारांनी ईडीच्या छापेमारीविरोधात गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले. जवळपास दीड तास हे आंदोलन सुरू होते. खासदार डेरेक ओ ब्रायन, महुआ मोईत्रा, कीर्ति आझाद, बापी हलदर, शताब्दी रॉय, साकेत गोखले, प्रतिमा मंडल आणि शर्मिला सरकार असे आठ खासदार यावेळी उपस्थित होते. गृहमंत्र्यांच्या आदेशावरून तपास यंत्रणांनी बंगालमधील विधानसभा निवडणुकीआधी तृणमूल काँग्रेसची रणनीती चोरण्याचा प्रयत्न केला. हाच आरोप गुरुवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लगावला होता.


पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना तिथून हटवण्याचा प्रयत्न केल्यावर पोलीस आणि खासदारांमध्ये शा‍ब्दिक चकमक उडाली. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना तिथून हटवले आणि फरफटत पोलीस स्थानकामध्ये नेले. पोलिसांनी महुआ मोईत्रा, शताब्दी रॉय, प्रतिमा मंडल यांना फरफटत पोलीस व्हॅनमध्ये कोंबले. पोलिसांनी सर्व खासदारांना स्ट्रीट पोलीस स्थानकात नेले. कायदेशीर कारवाईनंतर खासदारांची सुटका करण्यात आली.

तृणमूल काँग्रेसच्या आयटी सेल कंपनीवर ईडीची धाड; हवालाच्या संशयावरून कार्यालयाची झाडाझडती, ईडीच्या कचाट्यातून ममतांनी फायली हिसकावल्या

पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपवर हल्ला चढवला. आम्ही भाजपला पराभूत करू. लोकांमधून निवडून आलेल्या खासदारांसोबत दिल्ली पोलीस कसे वर्तन करताहेत हे संपूर्ण देश पाहतोय, असे त्या म्हणाल्या.

अमित शहा ईडीच्या अधिकाऱ्यांचा वापर करत असून ईडीचे अधिकारी आमची राजकीय कागदपत्र चोरण्यासाठी आले होते, असा आरोप खासदार प्रतिमा मंडल यांनी केला. तसेच भाजप पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जिंकू शकत नाही. त्यामुळे अशी खालची पातळी गाठत आहे, असेही त्या म्हणाल्या.