
लहान मुलांवरील परिणामांचा विचार करून इंटरनेटवरील पॉर्नोग्राफीच्या नियंत्रणासाठी 10 पक्षांचे राज्यसभेतील 14 खासदार एकत्र आले आहेत. यासंदर्भात ‘ट्राय’बरोबरच व्हॉट्स ऍप आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियातील लोकप्रिय साईट्सच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून तोडगा काढण्याचा निर्णय खासदारांनी घेतला आहे.
राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी 14 खासदारांचा अनौपचारिक ग्रुप बनवला आहे. लहान मुलांना इंटरनेटवरील पॉर्नोग्राफीपासून दूर कसे ठेवता येईल, त्यांना अशा साईट्स उघडता येऊ नयेत म्हणून काय पावले उचलली पाहिजेत, या पार्श्वभूमीवर ठोस उपाय सुचवण्यासाठी समिती स्थापन करण्याची सूचना नायडू यांनी काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना केली होती. एडीएमकेच्या खासदार विजिला सत्यानंथ यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. त्यानंतर सभापती नायडू यांनी समिती स्थापण्याची सूचना केली होती. त्याला अनुसरून राज्यसभेतील खासदार तातडीने सक्रिय झाले व त्यांनी सोमवारी पहिली बैठकही घेतली. या बैठकीत प्राथमिक स्वरूपाची चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
























































