
‘पीक अवर्स’ला लोकलच्या गेटवर लटकणाऱया प्रवाशांचा ‘बंदोबस्त’ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनोखी शक्कल लढवली आहे. फूटबोर्डवर उभे राहणारे प्रवासी डब्याच्या गेटवरील वरच्या भागात असलेल्या पन्हाळीला धरून प्रवास करतात. त्या पन्हाळीची रचना बदलण्यात येत आहे. अपघाताचा धोका टाळण्यासाठी कुर्ला कारशेडमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या बदलाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनना सकाळी आणि सायंकाळी ‘पीक अवर्स’ला प्रचंड गर्दी होते. लोकलमध्ये शिरण्यासही जागा नसते. अशा स्थितीत अनेक प्रवासी लोकलच्या गेटवरील पन्हाळीला पकडून जीवघेणा प्रवास करतात. त्यामुळे प्रवासी खाली पडून गंभीर जखमी किंवा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. या अपघातांना आळा घालून लोकल प्रवास सुरक्षित बनवण्यासाठी ट्रेनच्या गेटवरील पन्हाळीची पारंपरिक रचना बदलण्यात येणार आहे. 9 जून रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्या अपघाताची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्यात आली आणि लोकल प्रवासाच्या सुरक्षेबाबत अहवाल सादर करण्यात आला. अहवालात विविध शिफारशींबरोबरच पन्हाळीच्या रचनेवर बोट ठेवण्यात आले होते.
टप्प्याटप्प्याने रचना बदलणार
लोकल प्रवासातील अपघात टाळण्यासाठी उच्चस्तरीय समितीने विविध लघुकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या आहेत. त्याला अनुसरून मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला कारशेडमध्ये प्रायोगिक तत्त्वावर दोन ते तीन डब्यांमध्ये पन्हाळीची पारंपरिक रचना बदलण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वच लोकलच्या गेटवरील पन्हाळीची रचना बदलली जाईल.




























































