
दहा दिवसांच्या गणपती बाप्पाच्या परतीचा मार्ग सुखकर होणार आहे. पावसाने उघडीप घेतल्यामुळे शहरात खड्डे बुजवण्याचे काम दिवसरात्र युद्धपातळीवर सुरू झाले आहे. गेल्या तीन दिवसांत शहरातील 640 खड्डे बुजवण्यात आले असून अनंत चतुर्दशीच्या सायंकाळपर्यंत आणखी 710 खड्डे भरले जाणार आहेत. त्यामुळे विसर्जन मार्गावरील खड्डय़ांचे विघ्न टळणार आहे.
ठाणे शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवण्याचे निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार कामेही सुरू झाली. रविवारी सार्वजनिक मंडळांच्या मोठय़ा गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने गेल्या तीन दिवसांपासून खड्डेभरो मोहीम युद्ध पातळीवर हाती घेतली आहे. त्यामुळे विसर्जन घाट मार्गावरील बहुतेक खड्डे बुजवण्यात येत आहेत.
अभियंता, अतिरिक्त आयुक्तांपासून महापौरांपर्यंत सगळी टीम रस्त्यावर
ठाणे महापालिकेचे नगर अभियंता, सर्व प्रभागांतील अभियंत्यांसह खुद्द अतिरिक्त आयुक्त आणि महापौरही रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी उतरले आहेत. गेल्या तीन दिवसांत एपूण सरासरी 2 हजार 700 चौरस मीटरचे 640 खड्डे बुजवण्यात आले आहेत. तर 3 हजार 200 चौरस मीटरचे 710 खड्डे बुजवण्याचे आव्हान अजूनही पालिकेसमोर आहे. त्यासाठी शनिवारची पूर्ण रात्र जागून शहरातील उर्वरित खड्डे बुजविण्यात येणार आहेत. नगर अभियंता अर्जून अहिरे यांच्यासह महापौर नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी हेही खड्डे बुजवण्याच्या कामासाठी रात्रभर रस्त्यावर उतरणार आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत हे काम फत्ते करण्याचा प्रयत्न असल्याचे संदीप माळवी यांनी सांगितले.



























































