
फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या तोफखाना पोलिसांवर आरोपींच्या नातेवाईकांनी हल्ला करून आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याची घटना नेवासा तालुक्यातील भेंडा येथे घडली आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात आरोपीच्या चौघा नातेवाईकांवर सरकारी कामात अडथळा, आरोपीला पळून जाण्यास मदत व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मच्छिंद्र रामभाऊ धनवडे, सचिन उर्फ रुद्रा मच्छिंद्र धनवडे, सोनाली मच्छिंद्र कुसळकर व सुरेखा सागर धनवडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तोफखाना पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल गौतम नामदेव सातपुते यांनी फिर्याद दिली आहे.
तोफखाना पोलीस ठाण्यात 2021 मध्ये दाखल गुन्ह्यात कौस्तुभ महेश मोडे (रा. वांबोरी, ता. राहुरी) व सागर मच्छिंद्र धनवडे (रा. भेंडा, ता. नेवासा) हे दोघे आरोपी आहेत. यातील सागर धनवडे याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक भेंडा येथील आरोपीच्या घरासमोर गेले होते. यावेळी तेथे उभ्या असलेल्या धनवडे याला पकडले असता, त्याने आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी त्याच्या घरातून आलेल्या नातेवाईकांनी ‘आमच्या मुलाला सोडा, त्याला घेऊन जायचे नाही’ असा आरडाओरडा करून पोलिसांच्या पथकाला शिवीगाळ करून मारहाण केली.
याचा फायदा घेत आरोपी सागर धनवडे हा फरार झाला. त्यामुळे वरील चौघांवर सरकारी कामात अडथळा आणण्यासह पोलिसांवर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.



























































