कोरोना संकट… स्पॉन्सर्सची माघार… तरीही शो मस्ट गो ऑन

  • नामदेव शिरगावकर

टोकियो ऑलिम्पिकला शुक्रवारी खऱया अर्थाने सुरुवात झाली. कोरोनाचे संकट तसेच प्रमुख स्पॉन्सर्सने माघार घेतल्यामुळे हा क्रीडा महोत्सव रद्द होईल की काय अशी चिंता सतावत असतानाच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, जपानी सरकार व तेथील क्रीडा संघटनांकडून प्रचंड मेहनत घेण्यात आली आणि टोकियो ऑलिम्पिकचा श्रीगणेशा झाला. ही बाब खरोखरच प्रशंसनीय आहे.

जपानमधील जनतेचा टोकियो ऑलिम्पिकला विरोध होता आणि आताही आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. त्यात जगभरातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अधिकारी जपानमध्ये दाखल झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यामुळे आरोग्याला धोका पोहचू शकतो. त्यामुळे जपानमधील नागरिकांचा विरोध समजू शकतो.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती व जपान या दोघांसाठी ऑलिम्पिकचे आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचे होते. दर चार वर्षांनी हा क्रीडा महोत्सव आयोजित केला जातो. हे ऑलिम्पिक रद्द झाले असते तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला मोठा धक्का बसला असता. तसेच टोकियो ऑलिम्पिकमुळे जपान सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची घटना ठरली.

हिंदुस्थानच्या पदकांची संख्या वाढणार

जागतिक क्रमवारीत खेळाडू कोणत्या स्थानावर आहेत यावरून ऑलिम्पिकमध्ये ते कशी कामगिरी करू शकतील याचा अंदाज लावता येऊ शकतो. सध्या हिंदुस्थानचे बहुतांशी खेळाडू जागतिक रँकिंगमध्ये पहिल्या पाच स्थानावर आहेत. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या पदकांची संख्या वाढणार हे निश्चित आहे. कुस्ती, नेमबाजी, बॅडमिंटन, बॉक्ंिसग व वेटलिफ्ंिटग या खेळांमधून देशाला पदके मिळण्याची दाट शक्यता आहे.

प्रतिष्ठा जपली

कोरोनाचा फटका टोकियो ऑलिम्पिकला बसलाय. क्रीडागावात प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच मुख्य प्रायोजकांनीही यामधून माघार घेतली आहे. पण जपान यामुळे डगमगले नाही. कोरोनासाठी कडक नियमाचा अवलंब केला. आणीबाणी लागू केली. क्रीडा महोत्सवाला स्पॉन्सर्स लाभले नाहीत. पण या वेळी जपानने पैशांकडे बघितले नाही. त्यांनी आपली प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला.

आयओए मार्गदर्शकाच्या रूपात

हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) ही नेहमी मार्गदर्शकाच्या रूपात खेळाडूंना मदत करते. प्रत्येक राज्यांच्या असोसिएशन, प्रत्येक खेळांच्या संघटना यांनी खेळाडूंना तळागळात जाऊन मदत करायला हवी. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंसाठी आयओएकडून सातत्याने मदत केली जात आहे.

(टीप – लेखक हिंदुस्थानी ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या