कॅलेंडर वर्षात कधीही ऑलिम्पिक घेऊ शकतो! जपानच्या ऑलिम्पिक मंत्र्यांचे संसदेत उत्तर

चीनमधील ‘कोरोना व्हायरस’चा संसर्ग अनेक देशांत पोहोचला आहे. या प्राणघातक विषाणूने आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी घेतला आहेत. त्यामुळे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ‘टोकियो ऑलिम्पिक’लाही या व्हायरसचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना जपानचे ऑलिम्पिक मंत्री सीको हाशिमोटो यांनी ‘आपण 2020 या कॅलेंडर वर्षात कधीही ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करू शकतो,’ असे सांगून देशवासीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

सीको हाशिमोटो यांनी मंगळवारी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. ते म्हणाले, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा निर्धारित 24 जुलैला सुरू होऊ शकली नाही, तर काळजी करण्याचे कारण नाही. कारण 2020 या कॅलेंडर वर्षात आपण ऑलिम्पिकचे आयोजन करू शकलो नाही, तरच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) ही स्पर्धा स्थगित करू शकते. आपण वर्षाच्या शेवटीही या क्रीडाविश्वातील सर्वोच्च स्पर्धेचे आयोजन करू शकतो, असे सीको हाशिमोटो यांनी सांगितले.

‘आयओसी’चे पदाधिकारी आणि टोकियो ऑलिम्पिकचे आयोजक यांनी अजूनही टोकियो ऑलिम्पिक निर्धारित वेळेतच होईल याची खात्री वाटते. मात्र, महामारी बनलेल्या ‘कोरोना व्हायरस’मुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होऊ शकते, किंवा इतर शहरात स्थलांतरित करावी लागू शकते, असे काहींना वाटते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बॅच यांनी ऑलिम्पिक स्पर्धा टोकियोमध्येच होईल आणि निर्धारित वेळेतच होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

जपानची अर्थव्यवस्था पणाला

टोकियो ऑलिम्पिकच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपली ताकद जगाला दाखविण्यासाठी जपानने कंबर कसली आहे. ऑलिम्पिक कुंभमेळ्याच्या तयारीवर जपानने आतापर्यंत 12.6 बिलियन डॉलर्सहून अधिक खर्च केला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने घसरलेला जपानचा विकास दर वाढेल, अशी जपानला आशा आहे. मात्र, कोरोना व्हायरसने आतापर्यंत तब्बल 70 देशांना विळखा घातला आहे. 90 हजार लोकांना या विषाणूची लागण झाली असून, 3100 नागरिकांचा बळीही गेला आहे. जपानमध्येही या व्हायरसने आतापर्यंत 12 नागरिकांचा बळी घेतल्याने ऑलिम्पिकच्या आयोजनावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने जपान सरकार धास्तावले आहे. ऑलिम्पिकशी संबंधित अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. टोकियो ऑलिम्पिक रद्द करावे लागले, तर आपली अर्थव्यवस्था कोलमडेल याची जपानला जाण आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ही ऑलिम्पिक स्पर्धा झालीच पाहिजे यासाठी जपान सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या