
टोकियो ऑलिम्पिकची 23 जुलैपासून सुरुवात होणार असून हिंदुस्थानचे 88 जणांचे पथक रविवारी जपानच्या राजधानीत दाखल झाले. तिरंदाजी, बॅडमिंटन, टेबलटेनिस, हॉकी, ज्युडो, जिम्नॅस्टीक्स, जलतरण व वेटलिफ्टिंग या आठ खेळांतील खेळाडू व अधिकारी टोकियोमध्ये पोहोचले. याप्रसंगी नवी दिल्ली येथून एअर इंडियाच्या चार्टर्ड विमानामधून निघालेले हे पथक रविवारी टोकियो येथे पोहोचले.
वेटलिफ्टर, बॉक्सर, नेमबाजांची आधीच एण्ट्री
टोकियो ऑलिम्पिकसाठी वेटलिफ्टिंग या खेळात हिंदुस्थानकडून मीराबाई चानू या एकमेव खेळाडूला पात्र होता आले आहे. मीराबाई चानू शुक्रवारी टोकियो येथे पोहोचली. मीराबाई चानू अमेरिकेतील सेंट लुईस येथे ट्रेनिंग करीत होती. तेथून ती थेट टोकियो येथे रवाना झाली. हिंदुस्थानी बॉक्सर इटली येथून आणि नेमबाज क्रोएशिया येथून टोकियो येथे पोहोचले.
चिअर फॉर इंडिया
टोकियोत दाखल झालेल्या हिंदुस्थानच्या या पथकात 54 खेळाडूंचा समावेश होता. तसेच हिंदुस्थानी ऑलिम्पिक असोसिएशनचे पदाधिकारी व प्रत्येक खेळांतील सपोर्ट स्टाफ यांचाही यात समावेश होता. एअरपोर्टवर हिंदुस्थानी पथकाचे ‘क्युरोब सिटी’च्या प्रतिनिधींकडून स्वागत करण्यात आले. या वेळी हिंदुस्थानी पथकाचे वेलकम ‘चिअर फॉर इंडिया’ अशा शब्दांचा बॅनर लावून करण्यात आले हे विशेष.
सेलिंगपटूंचा गुरुवारपासून सराव सुरू
ऑलिम्पिकसाठी टोकियो येथे सर्वात प्रथम हिंदुस्थानी सेलिंगपटू पोहोचले. नेत्रा कुमानन, विष्णू सरावनन, के.सी. गणपती, वरुण ठक्कर हे चारही सेलिंगपटू युरोप येथून टोकियोत दाखल झाले. या चारही खेळाडूंनी गुरुवारपासून टोकियो येथे सरावाला सुरुवात केली.
विक्रमी 127 खेळाडू पात्र
टोकियो ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानच्या 127 खेळाडूंनी पात्रता मिळवली. हिंदुस्थानसाठी हा विक्रम ठरला आहे. याआधी रिओ ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानच्या 117 खेळाडूंनी पात्रता मिळवली होती. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत हिंदुस्थानी खेळाडूंचे पहिले पथक शनिवारी नवी दिल्लीहून टोकियोला रवाना झाले.




























































