अॅथलेटीक्समध्ये पाऊल पुढे पडेना, भालाफेक अन् गोळाफेकमध्ये सपशेल अपयशी

हिंदुस्थानी खेळाडूंची अॅथलेटीक्समधील निराशाजनक कामगिरी मंगळवारीही सुरूच राहिली. भालाफेकीत अन्नू राणी व गोळाफेकीत तजिंदरपाल सिंगला पात्रता फेरीचा अडथळाही ओलांडता आला नाही. त्यामुळे साहजिकच त्यांना पदकापासून दूरच रहावे लागले.

अन्नू राणी हिला भालाफेकीत फायनलमध्ये पोहोचता आले नाही. पहिल्या प्रयत्नात तिने 50.35 मीटर दूरवर भाला फेकला. त्यानंतर दुसऱया प्रयत्नात तिला 53.19 मीटर दूरवर भाला फेकता आला. अखेरच्या प्रयत्नात तिने प्रगती केली; पण फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. अन्नू राणी हिने 54.04 मीटर दूरवर भाला फेकला. पुढल्या फेरीत पोहचण्यासाठी 63 मीटर दूरवर भाला फेकणे गरजेचे होते. पण अन्नू राणी हिला वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपर्यंतही पोहोचला आले नाही. तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 63.24 मीटर इतकी होती. अखेर 14 स्पर्धकांमधून तिची अखेरच्या स्थानावर घसरण झाली.

13व्या स्थानावर घसरण

आशियाई विक्रमवीर हिंदुस्थानच्या तजिंदरपाल सिंग याला टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपला ठसा उमटवता आला नाही. पात्रता फेरीत त्याला गट एमध्ये 13व्या स्थानावरच समाधान मानावे लागले. या पात्रता फेरीत तजिंदरपाल सिंग याने 19.99 मीटर दूरवर गोळा फेकला; पण ही कामगिरी पुढल्या फेरीत त्याला नेऊ शकली नाही. त्याची सर्वोत्तम कामगिरी होती 21.49 मीटर. इंडियन ग्रांप्रीमध्ये केलेल्या याच कामगिरीच्या आधारावर त्याने ऑलिम्पिकचे तिकीट बुक केले होते. पण टोकियो ऑलिम्पिमध्ये त्याला याची पुनरावृत्ती करता आली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या