
कोरोनाचे संकट कायम असल्याने अनेक नव्या उपाययोजनांसह उद्या मंगळवारपासून (दि. 24) टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. यंदाच्या पॅरालिम्पिक क्रीडामहोत्सवात हिंदुस्थानी खेळाडू पदकांचा नवा इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाले आहेत. हिंदुस्थानच्या 54 खेळाडूंच्या पथकाकडून देशवासीयांना यावेळी दोन अंकी पदकांची अपेक्षा आहे. 1968पासून हिंदुस्थानचा पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभाग असतो. आतापर्यंत हिंदुस्थानने या स्पर्धेत 12 पदके जिंकली आहेत. यात रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानने सर्वाधिक 4 पदकांची कमाई केली होती. तो विक्रम यावेळी नक्की तुटणार असा क्रीडाप्रेमींचा विश्वास आहे.
हिंदुस्थानचे आतापर्यंतचे मोठे पथक
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानचे 54 खेळाडूंचे पथक सहभागी होत आहे. स्पर्धेच्या इतिहासातील हिंदुस्थानचे हे सर्वांत मोठे पथक होय. रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानने पाच क्रीडा स्पर्धांसाठी 19 खेळाडूंचे पथक पाठविले होते. यावेळी 9 वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांत हिंदुस्थानी खेळाडू कौशल्य पणाला लावणार आहेत. यंदा हिंदुस्थानी खेळाडू 10हून अधिक पदके जिंकतील, असा अंदाज आहे.
उद्घाटन सोहळा सायंकाळी साडेचारला
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हिंदुस्थानी वेळेनुसार सायंकाळी 4.30 वाजता सुरू होणार आहे.
मुरलीकांत पेटकर यांनी जिंकले होते पहिले पदक
हिंदुस्थानने 1968च्या पॅरालिम्पिक स्पर्धेपासून सहभाग घेण्यास सुरुवात केली असली तरी 1972च्या जर्मन पॅरालिम्पिक स्पर्धेत मुरलीकांत पेटकर यांनी हिंदुस्थानला पहिले पदक जिंकून दिले. त्यांनी जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. मागील 2016च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये हिंदुस्थानला दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कास्य अशी 4 पदके मिळाली होती. रिओच्या आधी 1984च्या न्यूयॉर्क पॅरालिम्पिकमध्येही हिंदुस्थानने 4 पदके जिंकली होती, पण त्यात सुवर्णपदकाचा समावेश नव्हता.
या खेळाडूंकडून पदकाच्या अपेक्षा
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत 6 खेळाडूंकडून हमखास पदकाची अपेक्षा आहे. यामध्ये देवेंद्र झाझरिया (भालाफेक), मरियप्पन थंगावेलू (उंच उडी), सुहास एल. यतिराज (बॅडमिंटन), एकता भयान (थाळीफेक), प्रमोद भगत (बॅडमिंटन) व मनीष नरवाल (नेमबाजी) या खेळाडूंचा समावेश आहे. देवेंद्र झाझरियाने 2004 व 2016च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यावेळी देशवासीयांना त्याच्याकडून तिसऱया सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.
ऍथलेटिक्समध्ये सर्वाधिक खेळाडू
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानचे सर्वाधिक 24 खेळाडू ऍथलेटिक्समध्ये झुंजणार आहेत. हिंदुस्थानला सर्वाधिक पदकाच्या अपेक्षा या भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया, संदीप चौधरी व मागील रिओ पॅरालिम्पिकमधील उंच उडीतील सुवर्णपदक विजेता मरियप्पन यांच्याकडून आहेत. देवेंद्र झाझरियाने 2004 व 2016 मध्ये सुवर्ण जिंकले होते, तर संदीप जागतिक विजेता आहे.
उद्घाटन सोहळ्यात हिंदुस्थानचे 11 जणांचे पथक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात हिंदुस्थानचे केवळ 11 जणांचे पथक सहभागी होणार आहे. यात 5 खेळाडू तर 6 अधिकाऱयांचा समावेश असेल. उद्घाटन सोहळ्यातील पथकसंख्येला मर्यादा नसली तरी हिंदुस्थानचे केवळ 7 जणांचे पथकच टोकियोत दाखल झाले आहे. यातील सोनल पटेल व भाविना पटेल या टेबल टेनिसपटूंच्या बुधवारी लढती होणार आहेत. त्यामुळे त्यांना उद्घाटन सोहळ्यात सहभागी करून घेतले नाही. मरियप्पन थंगावेलू हा उद्घाटन सोहळ्यात हिंदुस्थानी पथकाचा ध्वजवाहक असेल. थाळीफेकपटू विनोद कुमार, भालाफेकपटू टेकचंद व पॉवरलिफ्टर जयदीप व सकिना खातून हे हिंदुस्थानी खेळाडू उद्घाटन सोहळ्यात सहभागी होतील.
22 खेळ, 540 क्रीडाप्रकार
24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर असे 13 दिवस चालणाऱया यंदाच्या पॅरालिम्पिक क्रीडामहोत्सवात 22 खेळांचा समावेश असून 136 देशांचे 3686 खेळाडू पदकांसाठी कौशल्य पणाला लावणार आहेत. टोकियोतील 21 मैदानांवर ही स्पर्धा होणार आहे. 13 दिवस चालणाऱया या स्पर्धेत एकूण 540 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
महिला नेमबाज प्रथमच खेळणार
पॅरालिम्पिकमध्ये प्रथमच हिंदुस्थानी महिला नेमबाज सहभागी होणार आहेत. रुबिना फ्रान्सिस 10 मीटर एअर पिस्तूल एसएच 1 व अवनी लेखरा 50 मीटर रायफल 3 पोझिशन एसएच 1 व 50 मीटर रायफल प्रोन एसएच 1 मिश्र प्रकारात पदकावर नेम धरतील. 19 वर्षीय बॅडिंमटनपटू पलक कोहली युवा खेळाडू असेल. सर्वाधिक 8 खेळाडू भालाफेक स्पर्धेत देशाचे नेतृत्व करणार आहेत.
बॅडिंमटन व तायक्वांदोचे पदार्पण
पॅरालिम्पिकमध्ये प्रथमच बॅडिंमटन व तायक्वांदो या खेळांचा समावेश करण्यात आला. हरिंवदर सिंग व विवेक चिकारा स्पर्धेसाठी पात्रता मिळवणारे पहिले तिरंदाज असतील. प्राची यादव हिंदुस्थानची पहिली पॅराकोनोइस्ट ठरेल. तायक्वांदोमध्ये अरुणा तंवर खेळेल.




























































