टोमॅटोचे दर कोसळल्याने खर्चही निघाला नाही, मिरजमधील शेतकऱ्याने तोडणी न करताच प्लॉट सोडून दिला

टोमॅटोचे दर पडल्याने उत्पादनखर्च सोडाच, पण तोडणी करण्याचा खर्चही निघत नसल्याने हतबल होत मिरज तालुक्यातील बेडग येथील सारंग माळी या शेतकऱयाने टोमॅटोची तोडणी न करताच पिकाचा प्लॉट तसाच सोडून दिला. या प्रकारची जोरदार चर्चा सुरू आहे.

मिरज तालुक्यातील बेडग येथील शेतकरी सारंग माळी यांनी दर चांगला असल्यामुळे आपल्या शेतात सहा एकर टोमॅटोची लागवड केली होती. माळी यांच्या अथक प्रयत्नांनी टोमॅटोचे चांगले उत्पादन झाले. मात्र, दर पडल्याने माळी हतबल झाले. टोमॅटो तोडण्याचा खर्च, मजुरी, दलाली, वाहतूक व औषधे यांचा खर्च अंगावर बसत असल्याने माळी यांनी टोमॅटोची तोडणी न करण्याचा निर्णय घेतला.

दोन टन टोमॅटो विकून दोन रुपयेही राहिले नाहीत!

सारंग माळी यांनी प्रथम टोमॅटो तोडले तेव्हा त्यांना किलोला चार रुपये दर मिळाला. दोन टन टोमॅटोचे फक्त आठ हजार रुपये झाले. मजुरी सहा हजार गेली. वाहतूक, हमाली वगैरे खर्च वगळता, दोन रुपयेही शिल्लक न राहिल्याने माळी यांनी पुढे टोमॅटो न तोडण्याचा निर्णय घेतला आहे. सहा एकर टोमॅटो लागवड करण्यासाठी एकूण चार लाख 40 हजार खर्च झाला असल्याचे माळी यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या धोरणाचा फटका

केंद्र सरकारचे चुकीच्या निर्यात धोरणामुळे शेतकऱयांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यात राज्य सरकारकडूनही शेतकऱयांना सहकार्य मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. इतर देशांत शेतमालास चांगला दर मिळतो आहे; परंतु हिंदुस्थानात शेतकऱयाला लागवडीसाठी केलेला खर्चही निघत नसल्याची खंत माळी यांनी व्यक्त केली.