नगर – खुल्या बाजारातही तुरीने हमीभावाचा टप्पा ओलांडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासनाकडून तुरीची हमीभावाने खरेदी केली जात असली तरी खुल्या बाजारात आता तुरीने हमीभावाचा टप्पा ओलांडला आहे. नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला 6 हजार 650 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सध्या नगरसह जिल्हाभरात सुमारे पाचशे क्विंटलच्या जवळपास तुरीची आवक होत आहे. खुल्या बाजारात दर वाढल्याने हमी केंद्रावरील तूर खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यात यंदा 58 हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. काही भागातील नुकसानीचा अपवाद वगळला तर यंदा चांगल्या पावसामुळे तुरीचे बंपर उत्पादन निघाले आहे. तूर बाजारात आल्यानंतर दर्जा चांगला नसल्याचे सांगत कमी दराने खरेदी केली जात असल्याने हमीदराने खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

त्यानुसार नगर जिल्ह्यात 12 ठिकाणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमधून तूर खरेदी केली जात आहे. मात्र, अनेक वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच खुल्या बाजारात तुरीने हमी दराचा टप्पा ओलांडला आहे. एक महिन्यापूर्वी साधारण पाच हजार रुपये, तर पंधरा दिवसांपूर्वी साडेपाच हजारांचा दर तुरीला मिळाला होता. गेल्या आठ दिवसांत त्यात वाढ होऊन सहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तुरीची हमी केंद्रावर सहा हजार रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केली जात असली तरी खुल्या बाजारात 6 हजार 650 रुपयांचा दर खुल्या बाजारात मिळत आहे.

खुल्या बाजारात दर वाढल्याने हमी केंद्रावरील तूर खरेदीवर परिणाम होताना दिसत आहे. तुरीच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तुरीच्या दरवाढीचा तूर डाळीच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

तूर पिकावर दृष्टिक्षेप

  • नगर जिल्ह्यात खरीप हंगामात 58 हजार हेक्टरवर पेरण़ी
  • हेक्टरी सुमारे पंधरा क्विंटल उत्पादन.
  • जिल्ह्यात बारा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रे.
  • हमीभाव प्रतिक्विंटल 6000 रुपये
  • खुल्या बाजारात 6650 रुपये प्रतिक्विंटल विक्री.