चीनचे भावी परराष्ट्रमंत्री चौकशीसाठी ताब्यात, पोलादी पडद्याआड मोठ्या हालचाली

चीनमधील कम्युनिस्ट राजवटीच्या पोलादी पडद्यामागे राजकीय हालचालींना वेग आला आहे. चीनमधील दिग्गज मुत्सद्दी व संभाव्य परराष्ट्र मंत्री ली जीनशाव यांना अचानक ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई का करण्यात आली याबाबत अधिपृत काहीही माहिती मिळू शकलेली नाही.

ली जीनशाव हे 61 वर्षीय नेते चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख आहेत. परदेशातील राजकीय पक्ष व डाव्या विचारांच्या राष्ट्रांशी संबंध ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या विभागावर आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. परदेश दौऱ्यावरून परतताच ही कारवाई करण्यात आली.

पक्षाच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाचे प्रमुख म्हणूनही ली यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. 2023 साली चीनने कीन गँग यांना परराष्ट्र मंत्रीपदावरून तडकाफडकी दूर केले होते. त्यानंतर ली यांच्या विरोधात होत असलेली ही सर्वात मोठी चौकशी आहे.