कर्जतमध्ये जलविद्युत प्रकल्पासाठी जमिनी बळकावण्याचा डाव; कन्सल्टंट कंपनी, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

कर्जत तालुक्यातील गौरकामत येथे टॉरेंट पीएसएच ३ प्रा. लि. कंपनी जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे. मात्र शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच या प्रकल्पासाठी जागा बळकावण्याचा डाव असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गौरकामत येथे आज झालेल्या पर्यावरणीय जनसुनावणीत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत पर्यावरणासंदर्भात खोटा अहवाल सादर करणाऱ्या कन्सल्टंट कंपनी आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे.

कर्जत तालुक्यातील पाली ग्रामपंचायत हद्दीतील साईडोंगर व पाली, वदप ग्रामपंचायत हद्दीतील ढाक, पोटल ग्रामपंचायत हद्दीतील पोटल व आंबोट आणि भालिवडी ग्रामपंचायत हद्दीतील भालिवडी या ठिकाणी ३००० मेगावॅट पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी २३३ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून पाली आणि ढाक या दोन ठिकाणी दोन जलाशयांची निर्मिती केली जाणार आहे. ढाक डोंगर-माथ्यावर २७ मीटर उंचीचे धरण बांधण्यात येणार आहे, तर पाली येथील पेज नदीवर ५९ मीटर उंचीचे धरण बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या उदंचन प्रकल्पासाठी सुमारे १३,०१७ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मात्र या प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे.

अहवालात जंगलाऐवजी ‘झुडपे’ दाखवले

तहसीलदार धनंजय जाधव व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी ऋतुजा भालेराव यांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीत शेतकऱ्यांनी प्रशासनावर हल्ला चढवला. पश्चिम घाट हा इको सेन्सेटिव्ह झोन असतानाही अहवालात जंगलाऐवजी ‘झुडपे’ दाखवले गेले आहेत. ही थेट जनतेची फसवणूक आहे. येथे ४०० हून अधिक पक्ष्यांच्या जाती, सरपटणारे प्राणी आणि महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू आढळतो, पण कन्सल्टंट अहवालात त्याचा उल्लेख नाही. प्रशासन व कंपनी संगनमताने ग्रामस्थांच्या जमिनी व हक्कांवर गदा आणत आहेत. त्यामुळे कन्सल्टंटवर गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.