ओलीस ठेवलेल्या इस्रायली महिला सैनिकांचा अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल

हमासच्या दहशतवाद्यांकडून ओलीस ठेवलेल्या इस्रायली महिला सैनिकांवरील अत्याचाराचा, त्यांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात महिलांच्या चेहऱयाला गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू प्रचंड संतापले असून आता हमासला संपवण्याचा माझा इरादा आणखी मजबूत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेले युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलमधील ओलिसांची सुटका करण्याची मागणी जोर धरू लागली असतानाच टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार इस्रायलच्या होस्टेज अॅण्ड मिसिंग फॅमिली पह्रमने 7 ऑक्टोबरच्या हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याशी संबंधित एक नवीन व्हिडीओ जारी केला आहे. यात हमासच्या सैनिकांनी इस्रायलच्या 5 महिला सैनिकांना ओलीस ठेवल्याचे दिसत आहे. गाझा सीमेजवळील नहल ओझ तळावर या महिलांना तैनात करण्यात आले होते.