नासाला तगडे आव्हान; इस्रो आणि रशियाची रॉसकॉसमॉस एकत्र, लवकरच मोठी अंतराळ मोहीम आखणार

अमेरिकेने इशारा देऊनही रशियाची मैत्री अधिक दृढ करणाऱ्या हिंदुस्थानच्या इस्रो अर्थात अंतराळ संस्थेने रशियन अंतराळ संस्था रॉसकॉसमॉसशी हातमिळवणी केली आहे. दोन्ही अंतराळ संस्था एकत्रितपणे मोठा अंतराळ कार्यक्रम राबवणार आहेत. या दोन संस्था एकत्र आल्यानंतर अमेरिकेच्या नासासमोर तगडे आव्हान निर्माण होणार असल्याची चर्चा आहे.

हिंदुस्थानने रशियन पंपन्यांनाही देशातील नावीन्यपूर्ण अंतराळ प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तसेच हिंदुस्थानच्या मोठय़ा बाजारपेठेत येण्यासाठी आमंत्रित केले आहे, अशी माहिती रशियातील हिंदुस्थानचे राजदूत विनय कुमार यांनी दिली आहे. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त हिंदुस्थानी दूतावासात आयोजित कार्यक्रमात कुमार बोलत होते. दरम्यान, 1975 मध्ये हिंदुस्थानने सोव्हिएत रशियाच्या सहकार्यानेच आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट प्रक्षेपित केला होता. त्यानंतर 1984 मध्ये हिंदुस्थानी वैमानिक राकेश शर्मा यांनी सोयुझ टी-11 अंतराळयानातून अंतराळ प्रवास केला होता. ही एक मोठी कामगिरी होती. सध्या गगनयान मानवी अंतराळ मोहिमासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवरही दोन्ही देशांमध्ये सहकार्य सुरू आहे.