5 देशांतली सोपी भटकंती

71

श्रीकांत उंडाळकर,[email protected]

परदेशात भटकंती ही जरी सामान्यांच्या आवाक्याबाहेर राहिली नसली तरी या भटकंती पूर्वीचे सोपस्कार बरेच क्लिष्ट आणि लांबलचक असतात. त्यातील सर्वात पहिली पायरी म्हणजे व्हिसा. व्हिसासाठीची नावनोंदणी, वेळा, मुलाखती… या साऱया गोष्टीत आपली दमछाक होते. पण आपल्या मित्रराष्ट्रांनी हिंदुस्थानींसाठी त्यांच्या देशात अक्षरशः लाल गालिचा घालून स्वागत केले आहे. भुतान, नेपाळ, बाली, मालदिव, मॉरिशस येथे आपल्याला व्हिसाशिवाय सहज प्रवेश मिळतो तेव्हा जवळच्या जवळ परदेशवारीची हौस पूर्ण करून घ्या… nepal-1नेपाळ

नेपाळ संपूर्ण जगात ओळखला जातो ते म्हणजे सागरमाथा- म्हणजेच जगातील सर्वौच्च शिखर माऊंट एवरेस्ट. माऊंट एवरेस्टसोबतच जगातील सर्वात 10 अत्युच्च शिखरांमधील आठ शिखरं नेपाळमध्येच आहेत. त्यात अन्नपूर्णा, मकालू, ल्होत्से अशी अनेक शिखरं आहेत. नेपाळ हे एकमेव असे स्वतंत्र राष्ट्र आहे ज्याचा राष्ट्रध्वज हा त्रिकोणी आकाराचा आहे. नेपाळमध्ये हिमशिखरे, हजारो वर्षापूर्वीची मंदिरे, चितकनसारखी अनेक जंगलं, पोखरासारखी थंड हवेची ठिकाणं आणि हिंदूंचे श्रद्धास्थान असणारे राजधानी काठमांडू येथील पशुपतिनाथाचे मंदिर अशी अनेक ठिकाणं आहेत. एव्हरेस्टच्या पायथ्याशी असणारा ‘लुकला’ हा जगातील सर्वात धोकादायक धावपट्टी असणारा विमानतळदेखील नेपाळमध्येच आहे. असंदेखील मानलं जातं की ‘येति’ हा हिममानवदेखील या ठिकाणी वास्तव्यास आहे. नेपाळ आणि हिंदुस्थानातील जुन्या मैत्री करारामुळे हिंदुस्थानी आणि नेपाळी बंधूभगिनी सहजपणे एकमेकांच्या देशात कामं करू शकतात. खाण्याबाबत म्हणाल तर नेपाळी लोकांनी हिंदुस्थानातीलच खाद्यपदार्थ आत्मसात केले आहेत. त्यामुळे तेथे आपल्याकडील पदार्थांची रेलचेल आहे.

bali-3

भुतान

भुतान म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती बौद्ध भिख्खूंचे मठ आणि संपूर्ण हिरवागार प्रदेश. होय भुतान राष्ट्र आहेच तसं. भुतानला ‘लॅन्ड ऑफ थंडर ड्रगॉन’ असे संबोधले जाते. म्हणजेच हिमवादळांना झेलून घेणारा हा देश आहे, असे समजले जाते. या देशात ‘किंग रूल’ आहे. म्हणजेच येथील ‘राजा’ या देशाचे नियमन, प्रशासन सांभाळतो. ‘थिंफू’ हे या देशाच्या राजधानीचे संपूर्ण जगात असे एकमेव शहर आहे. जेथे ट्रॅफिक सिग्नल अजिबात नाहीए. संपूर्णपणे डोंगर दऱयांनी नटलेला हा प्रदेश अतिशय सुंदर आहे. तेथील रस्ते उत्तम प्रतीचे असून हॉर्न वाजवावेच लागत नाहीत. त्यामुळे प्रवासाचा त्रास होत नाही. 1974 साली जन्माला आलेला हा देश ‘सुखी’ माणसांचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. फिरण्यासाठी जगप्रसिद्ध अशी तात्त्संग मॉनेस्ट्री म्हणजेच ‘टायगर मॉनेस्ट्री’, रिंपून झोन्ग किल्ला, थिंफू येथील भगवान बुद्धाची 169 फुटी ब्राँझची मूर्ती, नॅशनल म्युझियम, पुनाखा येथील झुलता पूल अशी अनेक ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. पक्षी आणि प्राण्यांची कुठल्याही कारणाने तेथे हत्या केली जात नाही. त्यामुळे तेथे वन्यजीवन फारच छान आहे. खाद्यपदार्थांमध्ये मुख्यत्वे करून भाताचा वापर जास्त असतो. थुक्पा, नुडल्स असे प्रकारचे खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत.

scene1

इंडोनेशिया – बाली

इंडोनेशियामध्ये अनेक प्रांत फिरण्यासारखे आहेत. जकार्ता ही या देशाची राजधानी असून जाका, सुमात्रा अशी सुंदर बेटे आणि त्यात सुलाकेसी, न्यू गिनिआ, बोर्नियो अशी जगप्रसिद्ध जंगले आहेत. कोमोडो ड्रगन या भल्यामोठय़ा घोरपडीचा प्रकार येथील कोमोडो पार्कमध्ये पाहायला मिळतो. येथील योग्यकर्ता-बोरोबोडूर या ठिकाणी भगवान बुद्धाचे जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. इंडोनेशिया आणि त्याच्या सभोवतालच्या जवळजवळ सर्वच प्रदेशाला अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. अतिशय शांत आणि स्वच्छ पाणी असल्याने इथे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. याचाच एक भाग असलेला बाली हा प्रदेश तर पर्यटकांचे खास आकर्षण आहे. विशेषत मधुचंद्राला जाणाऱयांसाठी हे लोकप्रिय आहे. बाली हे ठिकाण कुटा, सेमिनयाक, उबुड अशा भागांमध्ये विखुरलेले आहे. या सर्वच ठिकाणी समुद्राचे पाणी हे नितळ असल्याने हे वॉटर स्पोर्ट्ससाठी उत्तम ठिकाण आहे. उबुड हे ठिकाण चित्रकला आणि हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहेत. इथे रंगकलेले मुखवटे, टोपल्या, फ्रेम्स, बॅग्स, बांगडय़ा, गळ्यातल्या माळा, किचेन्स असे शेकडो प्रकार खरेदी साठी उपलब्ध आहेत. इकडे कुठल्याही ऋतूत जाता येते आणि खाण्यापिण्यासाठी इंडोनेशियन पदार्थांसोबतच हिंदुस्थानी, चायनीज, जपानीज, युरोपियन स्टाइलचे अनेक उत्तम पर्याय आहेत.

maldivs

मालदीव

हिंदुस्थानच्या दक्षिणेकडे हिंदी महासागरात कसलेला हा छोटासा टुमदार असा शांतताप्रिय आणि स्वच्छताप्रिय देश आहे. इकडे समुद्र पर्यटन हाच महत्त्वाचा उद्योग आहे. कमी लोकसंख्या असलेला हा देश बेट असल्यामुळे याला निसर्गरम्य, सुंदर आणि शांत समुद्रकिनारा लाभलेला आहे. गजबजाटापासून दूर आणि एकांत ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी हा अगदी योग्य पर्याय आहे. मालदीवला ‘समुद्र बंगले’ अशी संकल्पना आहे. हे समुद्राच्या पाण्यावर मचाणासारखे किनाऱयालगत बांधलेले असतात. म्हणजे आपण अगदी पाण्यावरच राहतो असा भास असतो. माले या मालदीवच्या राजधानीच्या शहरास भेट देऊन तिकडे अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करता येतात. मालदीवला खाजगी बेटेही आहेत. तेथील बंगले किंवा हॉटेलमध्ये राहू शकता. मालदीव ही मासेप्रेमींसाठीची खास जागा आहे.

mauritius-2

मॉरिशस

आफ्रीका खंडात असलेला तरी हिंदुस्थानातील अनेक लोकांना प्रिय असलेला छोटासा आणि निसर्गरम्य देश म्हणजे मॉरिशस. पोर्ट लुईस हे या देशाचे राजधानीचे शहर आहे. मॉरिशसदेखील हिंदी महासागरात कसलेले बेट आहे. हा देश सुंदर समुद्र आणि नितळ पाण्याने वेढलेला आहे. मॉरिशसमध्ये अनेक महाराष्ट्रीय लोकं वावरताना दिसतात. तेथे मराठी मंडळदेखील आहे. येथे असलेला ‘टेमेरिंड धबधबा’ पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येत असतात. हा निसर्गाचा एक अद्भुत नजराणाच आहे. केमेरल कलर अर्थ नावाच्या डोंगराळ परिसरामध्ये मातीचा रंग हा लाल, काळा, जांभळा, पिवळसर अशा वेगवेगळ्या रंगांचा आहे. सूर्येादय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथील निसर्ग सौंदर्य पाहून अवाक व्हायला होते. येथील गंगा तलाव आणि त्यालगतची हिंदू मंदिरे फारच सुरेख आहेत. ब्लॅक रिव्हर या नावाने ओळखल्या जाणाऱया राष्ट्रीय उद्यानाला भेट देताना तेथे एक दिवसासाठी अनेक कार्यक्रम आखू शकता. त्यात पक्षी निरीक्षण, ट्रेकिंग करता येते. येथे जगातील अनेक भागातून लोक येत असल्याने जेवणा-खाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

वरीलपैकी नेपाळ आणि भुतानला अनुक्रमे गोरखपूर आणि सिलिगुडी या ठिकाणांहून वाहनाने जाता येते. यासाठी निवडणूक ओळखपत्र किंवा पासपोर्ट आवश्यक आहे, मात्र विमानाने जायचे असल्यास वरील सर्वच ठिकाणी पासपोर्ट आवश्यक आहे. चला तर मग, पटापट वरीलपैकी एखादे ठिकाण निवडा आणि सुंदर अनुभव घेऊन या.

आपली प्रतिक्रिया द्या