सीएए आंदोलनाचा पर्यटनाला फटका; ताजमहालचे पर्यटक 60 टक्क्यांनी घटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाचा पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या ताजमहालच्या पर्यटक संख्येत तब्बल 60 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या 15 दिवसांत दोन लाखांहून अधिक पर्यटकांनी ताजमहालला भेट देण्याचा प्लॅन रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

सीएए लागू करण्याच्या मोदी सरकारच्या धोरणाविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्याचा मोठा फटका ताजमहालला बसला आहे. येथे दररोज देशासह विदेशातून मोठय़ा प्रमाणावर पर्यटक येतात. मात्र सीएएविरोधी आंदोलने सुरू झाल्यापासून या पर्यटकांच्या संख्येला उतरती कळा लागली आहे. गेल्या 15 दिवसांत दोन लाखांहून अधिक देशीविदेशी पर्यटकांनी नियोजित ताजमहाल दौरा रद्द केला. ताजमहालच्या बाजूलाच असलेल्या विशेष पर्यटक पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश कुमार यांनी ही माहिती दिली. पर्यटक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ताजमहाल व आसपासची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्हाला वारंवार फोन करतात. आम्ही त्यांना सुरक्षेबाबत हमी देतो. मात्र अनेकजण आपला दौरा रद्द करीत आहेत, असे दिनेश कुमार यांनी स्पष्ट केले.

यूपीत सर्वात जास्त सीएएविरोधी हिंसाचार

सीएएविरोधात उसळलेल्या हिंसाचारात सर्वात जास्त बळींची नोंद उत्तर प्रदेशमध्येच झाली. इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशात मोठय़ा प्रमाणावर आंदोलने करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर आग्रा शहरातील इंटरनेट सेवेसह काही रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्याचा पर्यटन व्यवसायावर जवळपास 50 ते 60 टक्क्यांनी परिणाम झाला.

सात देशांकडून ट्रव्हल ऍलर्ट जारी

सीएएविरोधात देशभरात आंदोलने सुरूच असल्याच्या पार्श्वभूमीवर सात देशांनी ट्रव्हल ऍलर्ट जारी केला आहे. अमेरिका, ब्रिटन, रशिया, इस्रायल, सिंगापूर, कॅनडा आणि तैवान या देशांनी आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हिंदुस्थानातील हिंसाचाराची दाट शक्यता असलेली पर्यटन स्थळे तसेच इतर संवेदनशील भागांत न जाण्याच्या सूचना पर्यटकांना करण्यात आल्या आहेत.