
उरण-भाऊचा धक्का लाँच सेवा गाळात रुतली आहे. आजपासून सहा दिवस संध्याकाळनंतर वाहतूक बंद करण्यात आली असून त्याचा मोठा फटका पर्यटकांना बसला आहे. गेल्या दोन वर्षांपासून समुद्रातील गाळ न काढल्यामुळे लाँच सेवा चालवताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते.सोमवार ८ डिसेंबरपर्यंत उरण-भाऊचा धक्का लाँच वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने पर्यटनावरदेखील परिणाम होणार आहे.
मुंबईहून उरणकडे अनेक चाकरमानी नोकरीधंद्याच्या निमित्ताने रोज लाँचने प्रवास करतात. आता सहा दिवस त्यांना रस्ते मार्गाने लांब प्रवास करावा लागेल. मोरा येथे असलेली जेट्टी अंदाजे ६० वर्षांपूर्वीची आहे. ती समुद्रात भराव टाकून ब्रेक वॉटर पद्धतीने बांधल्याने गेली अनेक वर्षे तेथे गाळ साचला आहे. दोन वर्षांपूर्वी काही प्रमाणात हा गाळ काढण्यात आला. त्यासाठी अंदाजे ४ कोटी रुपये खर्च केले तरीही गाळाची समस्या सुटलेली नाही.
मोरा बंदरात साचलेला गाळ व समुद्रातील भरती-ओहोटी यामुळे प्रवासी लाँच धक्कापर्यंत पोहोचत नाही. आता सलग सहा दिवस संध्याकाळनंतर लाँच वाहतूक बंद केली असल्याची माहिती एमएमडीचे बंदर निरीक्षक सुशील साटेलकर यांनी दिली. ओहोटी आणि गाळाच्या समस्येमुळे गेली अनेक वर्षे ठरावीक कालावधीसाठी प्रवासी वाहतूक बंद करण्याची वेळ येते. लवकरात लवकर बंदरात साचलेला गाळ काढावा आणि मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी प्रवाशांनी व स्थानिक नागरिकांनी केली आहे.
अनेक जण दत्तजयंतीला पोहोचलेच नाहीत
आज दत्तजयंती असल्याने अनेक प्रवाशांनी उरणमधील दत्तजयंती सोहळ्यासाठी लाँचने जाण्याचा बेत आखला होता. पण अचानक उरण ते भाऊचा धक्का लाँच सेवा आजपासून बंद ठेवल्याने दत्तजयंतीला जाता आले नाही. गाळाची समस्या दूर करून हा प्रश्न कायमचा मिटवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मोरा ते भाऊचा धक्कादरम्यान रोज २८ फेऱ्या होतात. सकाळी सात वाजता पहिली लाँच तर रात्री आठ वाजता शेवटची लाँच सुटते. दर महिना या लाँचने अंदाजे आठ हजार प्रवाशांची सागरी मार्गावरून वाहतूक होते.
दोन वर्षांपूर्वी मोरा व रेवस बंदराचा चार कोटी रुपये खर्चुन गाळ काढण्यात आला होता. मात्र आधुनिक तंत्रज्ञान वापरले गेले नाही. बार्जमधील क्रेनच्या सहाय्याने गाळ काढला.
नौदलाची जुनी ब्रेक बॉटर जेट्टी आणि जेएनपीए बंदराच्या विस्तारीकरणामुळे प्रचंड प्रमाणात समुद्रात माती दगडाचा भराव केला जात आहे. त्यामुळे बंदरात गाळ साचला असल्याचे सांगण्यात येते. याच गाळामध्ये लाँच रुतून बसतात.































































