
सामना ऑनलाईन । कसारा
ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी टॉवर वॅगन मध्यरात्री दीडच्या सुमारास उंबरमाळी स्थानकाजवळ घसरली आणि ऐन गणेशोत्सवात ‘मरे’चा ‘बाजा’ वाजला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कल्याण-कसारा मार्ग दहा तास ठप्प झाल्याने रेल्वे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. कसाऱयाहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे सकाळच्या सुमारास एकही लोकल न सुटल्याने संतप्त प्रवाशांनी वासिंद स्थानकात आंदोलन केले. या अपघातामुळे चाकरमान्यांचे हालच हाल झाले असून हार, फुले, पाने विक्रीसाठी मुंबईकडे घेऊन जाणाऱया आदिवासी महिलांनादेखील फटका बसला.
उंबरमाळी स्थानकाजवळ रात्री ट्रकच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे मध्यरात्री ब्लॉक घेण्यात आला होता. मोखावणे गेट येथेही ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्तीचे काम आटोपून रेल्वेची टॉवर वॅगन खर्डीच्या दिशेने जाणार होती. सिग्नल नसल्याने ती जागेवरच उभी होती. मात्र काही वेळाने सिग्नल मिळाल्याने टॉवर वॅगन तेथून निघाली. उंबरमाळी स्थानकाजवळच रेल्वे ट्रकच्या दुरुस्तीचे काम 30 कामगार करीत होते. समोरून टॉवर वॅगन येत असल्याचे दिसताच मुकादमाने शिट्टी वाजवली. तसेच लाल बॅटरी घेऊन एका कर्मचाऱयाने वॅगन थांबवण्याचीही सूचना दिली. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच कर्मचारी ट्रकच्या बाजूला पळाले. या धावपळीत पाच कामगार किरकोळ जखमी झाले. वॅगनचालकानेही वेग कमी करण्याचा प्रयत्न केला, पण ती नियंत्रणात न आल्याने वॅगन थेट एका पोलला आदळली आणि रुळावरून घसरली.




























































