लोणीकंद आणि लोणी काळभोर वाहतूक विभाग सुरू; वाहतूक नियोजनासाठी कर्मचाऱ्यांनी कसली कंबर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस आयुक्तालयातंर्गत लोणीकंद आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यांचा समावेश झाल्यामुळे आता प्रशासनाकडून वाहतुकीच्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग करण्यात आले आहे. त्यानुसार दोन्ही वाहतूक विभाग सुरू करण्यात आले असून प्रत्येकी एका अधिकाऱ्यासह 10 कर्मचाऱ्यांची वाहतूक नियमनासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते नुकतेच वाहतूक विभागाचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे उपस्थित होते.

लोणी काळभोर आणि लोणीकंद परिसरात नागरिकांना दररोज वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत होते. त्यापार्श्वभूमीवर पुणे वाहतूक विभागाकडून वाहतूक विभागाची स्थापना करण्यात आली आहे. दोन्ही वाहतूक विभागाला प्रत्येकी एक सहायक पोलीस निरीक्षक आणि 10 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता संबंधित पोलीस ठाण्यांतर्गत हद्दीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. शहर आणि ग्रामीण भागातील तुलनात्मक विश्लेषणाचा आराखडा तयार करून वाहतूक कोंडी सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.

त्यासाठी वायरलेस सेटअप, हद्दीची रूपरेखा, वाहनांच्या हस्तांतरणासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, वाघोली आणि सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात नागरीकरणाचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुणे शहराला लागून हा भाग असल्यामुळे दोन्ही पोलीस ठाण्यातंर्गत वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागणार आहे. कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक जयवंत पाटील उपस्थित होते.

आयुक्तालयातंर्गत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या लोणीकाळभोर आणि लोणीकंद पोलीस ठाण्यातंर्गत परिसरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात एक अधिकारी आणि 10 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच आणखी प्रत्येकी 10 कर्मचारी देत वाहतूक सुरळित ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.
– राहूल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा