
सामना प्रतिनिधी । पुणे
पुण्यात जेवढी माणसे आहेत तेवढीच वाहने आहेत. त्यात दुचाकींची संख्या तर प्रचंड आहे. ट्रॅफिकमध्ये या दुचाकी कधी कुठे घुसतील, कधी ब्रेक मारून आडव्या येतील याचा भरवसा नसल्याने चारचाकीवाल्यांना जपून गाड्या चालवाव्या लागतात. मात्र, मंगळवारी तर कहरच झाला. युद्धाच्या मैदानात शत्रूंची दाणादाण उडवून देणाऱ्या रणगाड्यालाही ट्रॅफिकमध्ये अडकावे लागले. दुचाकीस्वारांच्या आडमुठेपणाला सामोरे जाताना जवानांना रणगाड्यांसाठी वाट मोकळी करून घेताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.
विश्रांतवाडी येथे बॉम्बे सैपर्स येथून लष्कराच्या दुसऱ्या संस्थेत रणगाडा घेऊन जाण्यासाठी जवान निघाले. सोबत त्यांचा ट्रकही होता. रणगाडे जाण्यासाठी खास दगडी टँक रोड तयार केलेला आहे. या टँक रोडवरून रणगाडे जात असतांना नागरीकांनी बेशिस्तपणे लावलेल्या गाड्या, ट्रॅफिक जामने वाहतुकीचा खोळंबा झाला. यात प्रामुख्याने दुचाकीस्वार बाजूला सरकत नसल्याने जवानांना टँकमधून खाली उतरावे लागले. ट्रॅफिक बाजूला करण्यासाठी ट्रकचा हॉर्न वाजवावा लागत होता. तरीही दुचाकीस्वार पटकन बाजूला होण्यास तयार नव्हते. बराच खटाटोप केल्यानंतर कसाबसा रणगाडा आणि ट्रकला रस्ता मिळाला. पुणे वाहतूक पोलीस आणि महापालिकेकडून सध्या अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक, नो पार्किंग यावर धडक कारवाई सुरू आहे. असे असताना पुण्यातील बेशिस्त वाहतुकीचा आणखी एक नमुना अनुभवण्यास आला.





























































