दुर्गाडी पुलावरील ट्रॅफिकोंडी फुटणार

कल्याणच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा दुर्गाडी खाडीपूल आता तयार झाला आहे. दुर्गाडी पुलावरील ट्रॅफिककोंडी कायमची फुटणार असून जूनच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही लेन खुल्या होणार आहेत. शिवसेनेच्या सततच्या पाठपुराव्याने पुलाचे काम मार्गी लागले आहे.

कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडीपूल हा दोन लेनचा होता. सध्या अस्तित्वात असलेला पूल हा वाहतुकीसाठी अपुरा पडत होता. याच पुलाला समांतर सहा पदरी दुर्गाडी खाडी पुलाच्या कामाला २०१६ मध्ये सुरुवात झाली. पुलाच्या कामासाठी नेमलेल्या सुप्रीम कंत्राटदाराकडून दिरंगाई होत असल्याने त्याला दिलेले कंत्राट दोन वर्षांनंतर रद्द करण्यात आले. १०१ कोटी रुपये खर्चाचे सहा पदरी पुलाचे काम तांदळकर आणि थोरात कंपनीला देण्यात आले. या कंपनीने रायगड येथील सावित्रीपूल तयार केला होता. त्या कंपनीने पुलाचे काम युद्धपातळीवर केले. मात्र २०१९ मध्ये अतिवृष्टीचा बसलेला फटका आणि त्यानंतर कोरोना लॉकडाऊनमुळे पुलाच्या कामाची गती मंदावली होती. मात्र शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी वारंवार कामाच्या ठिकाणी भेटी देऊन ठेकेदाराला कामाची गती वाढवण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यामुळे काम मार्गी लागत आहे.

उर्वरित चार लेन वर्षभरात

जुना अस्तित्वात असलेला दोन लेनचा पूल आणि नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाच्या दोन लेन खुल्या झाल्यावर वाहतुकीसाठी चार लेन उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर उर्वरित चार लेनही वर्षभरात खुल्या केल्या जातील. भिवंडी-कल्याण-शीळ रोडवरील दुर्गाडी खाडीपूल हा महत्त्वाचा पूल आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कल्याण पत्रीपूल मार्गी लागला. त्यापाठोपाठ दुर्गाडीच्या दोन लेन खुल्या होत असल्याने वाहतूककोंडी सुटेल.

पोलीस बंदोबस्तात रिंग रोडचे काम

दुर्गाडी खाडीपूल आणि कल्याण रिंग रोड कामाची पाहणी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली. कल्याण रिंग रोडच्या दुर्गाडी ते मांडा टिटवाळादरम्यान त्यांनी दौरा केला. रिंग रोडचे या टप्प्यातील 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र काही ठिकाणी अडथळे आहेत. ज्या ठिकाणी कामाला विरोध आहे त्यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी एमएमआरडीएच्या वतीने रेलकॉन कंत्राटदार कंपनीने पोलीस व महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या