
बीकेसी कोविड सेंटरमध्ये काम करणाऱया महिला डॉक्टरची टॅक्सीत राहिलेली बॅग वांद्रे पोलीस चौकीचे पोलीस शिपाई मेहंबुब तांबोळी यांनी शोधून काढली. ई चलनवरून त्या टॅक्सी चालकाला शोधून काढत महिला डॉक्टरची बॅग त्यांना परत केली.
डॉ. कोमल जैन या वडाळा येथे राहत असून त्या बीकेसी कोविड सेंटरमध्ये काम करतात. दहा दिवसांपूर्वी डॉ. कोमल याने रात्रपाळीला जाण्यासाठी वडाळा येथून टॅक्सी पकडून त्या कोविड सेंटरमध्ये आल्या. कोविड सेंटरमध्ये उतरून त्या आत गेल्या. तेव्हा सोबत आणलेली एक बॅग टॅक्सीतच विसरल्याचे डॉ. कोमल यांच्या लक्षात आले. त्या बाहेर आल्या असता तो टॅक्सी चालक तेथून निघून गेला होता. डॉ. कोमल यांनी बॅग हरवल्याने वडाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली. वडाळा पोलिसांनी त्यांना बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले.
टॅक्सीत राहिलेली बॅग कशी शोधणार असा प्रश्न डॉ. कोमल यांना सारखा सतावत होता. तेव्हा डॉ. कोमल यांनी कोविड सेंटर बाहेर डय़ुटी करणाऱया एका पोलिसाची मदत घेतली. त्या पोलिसाने वांद्रे वाहतूक चौकीचे पोलीस शिपाई मेहंबूब तांबोळीचा नंबर दिला. त्यानंतर डॉ. कोमल यांनी तांबोळी यांना मोबाईलवर संपर्क साधला. डॉ. कोमल यांनी कोविड सेंटर येथील एक सीसीटीव्ही फुटेज तांबोळी यांना पाठवले. त्या फुटेजमध्ये टॅक्सीचा अस्पष्ट नंबर दिसत होता. त्या टॅक्सीचा शोध घेण्यासाठी तांबोळी यांनी ई चलनची मदत घेतली.
एका ई चलनाचा नंबर मॅच झाल्यावर त्या टॅक्सीच्या मालकाला शोधले. त्या मालकाला तांबोळी यांनी फोन केला. सुरुवातीला त्याने माहिती देण्यास नकार दिला. पोलिशी हिसका दाखवल्यावर त्याने ती टॅक्सी एक जण चालवत असल्याचे तांबोळी यांना सांगितले. तांबोळी यांनी त्या नंबरवर फोन करून त्या टॅक्सी चालकाला शोधून काढले. त्याला ती बॅग घेऊन वाहतूक चौकीत बोलावले. त्या टॅक्सी चालकाकडून ती बॅग घेऊन डॉ. कोमल यांना परत करण्यात आली. बॅग परत मिळाल्यावर डॉ. कोमल यांनी वाहतूक पोलिसांचे आभार मानले.


























































