
सामना प्रतिनिधी, मुंबई/माणगाव
दीपावलीनिमित्त सलग आलेल्या सुट्टय़ांमुळे कोकणात पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती, मात्र सुट्टी संपताच हे सर्व पर्यटक परतीच्या प्रवासाला निघाले. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन या पर्यटकांची वाहनातच लटकंती झाली, तर मालवणमध्ये देवबाग-तारकर्ली किनाऱयावर पर्यटकांनी अलोट गर्दी केल्यामुळे सिंधुदुर्गातील हॉटेल, रिसॉर्ट हाऊसफुल्ल झाले होते.
दिवाळी व सलग आलेल्या सुट्टय़ांमुळे रायगडला पर्यटकांनी पहिली पसंत दिली असल्याने लाखो पर्यटक जिह्यात दाखल झाले होते. चाकरमानी तसेच पर्यटक आता परतीच्या मार्गावर निघाले असल्याने सायंकाळपासून माणगाव, वडखळ ते पेण येथे मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी झाली आहे. त्यामुळे येथील वाहतूक संथगतीने सुरू आहे, तर वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
दिवाळी व सलग आलेल्या शनिवार-रविवार सुट्टय़ांमुळे पर्यटक श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड या भागात पर्यटनास आलेले आहेत. त्याचबरोबर चाकरमानीही दिवाळीनिमित्त रायगडसह कोकणात गेले होते. पर्यटक व चाकरमानी हे परतीच्या प्रवासाला निघाले असल्याने मुंबई-गोवा महामार्ग जाम झालेला आहे. परतीच्या मार्गाला पर्यटक व चाकरमानी निघाले असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईकडे जाणाऱया रस्त्यावर वाहतूककोंडी झाली आहे.
किनारपट्टी फुल्ल
किनारपट्टीवरील तारकर्ली-देवबाग व वायरी या गावांतील सर्वच हॉटेल ‘फुल’ झाल्याचे चित्र होते. तसेच किनारपट्टीवर जल पर्यटनाचा आनंद पर्यटकांकडून लुटला जात होता. तारकर्ली-देवबागला जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या.
summary- traffice jam on mumbai goa highway



























































