रेल्वेत फेरीवाल्यांचा सुळसुळाट, सहा महिन्यांत 21 हजार जणांविरोधात गुन्हे दाखल

मध्य रेल्वेवर फेरीवाल्यांचा सुळसुळाट झाल्या उपनगरीय लोकलबरोबरच लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्याची दखल घेत रेल्वेने गेल्या सहा महिन्यांत धडक कारवाई करत 21 हजार 749 जणांविरोधात गुन्हे दाखल करत अटक केली आहे. तसेच संबंधितांकडून 2 कोटी 72 लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे.

उपनगरीय लोकलसह एक्प्रेस ट्रेनमध्ये वेगवेगळय़ा प्रकारचे खाद्यपदार्थ, वस्तूंची विक्री करणे बेकायदेशीर आहे. या फेरीवाल्यांमुळे दाटीवाटीने प्रवास करणाऱया प्रवाशांची गैरसोय होते, तर एक्प्रेस ट्रेनमध्ये प्रवाशांच्या वस्तूंची चोरी होते. त्यामुळे प्रवाशांकडून फेरीवाल्यांबाबत अनेक तक्रारी येतात. त्याची दखल घेत रेल्वेने रेल्वे कायदा कलम 144 अंतर्गत एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत फेरीवालाविरोधी पथकाने मोठय़ा प्रमाणात फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली आहे. मागील वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत 18 हजार फेरीवाल्यांविरधात कारवाई केली होती. दरम्यान, मुंबई विभागात 8 हजार 629 फेरीवाल्यांविरोधात गुन्हे दाखल करत अटक केली आहे. भुसावळ विभागात 6 हजार 349 फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत सर्वाधिक 1 कोटी 15 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.