गाणी ऐकताना जीव गेला; लालबागजवळची घटना

मध्यप्रदेशातील बुऱ्हानपूरमधील दोन तरूणांचे हेडफोनने जीवनच संपवले आहे. हे दोन्ही तरूण हेडफोन ऐकत रेल्वे रुळावरून चालत होते. त्याचवेळी पाठीमागून एक भरधाव ट्रेन आली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. हेडफोनमुळे त्यांच्या कानापर्यंत ट्रेनची धडधड पोहोचलीच नाही आणि दोघांना मृत्यूने तिथेच गाठले. हा अपघात एवढा भीषण होता की त्या दोघांच्या देहाचे 50 ते 60 तुकडे झाले.

इरफान (19) आणि कलीम ( 16) हे दोघेही बुरहानपूरमधील बिरोदा गावात राहणारे होते. शुक्रवारी सायंकाळी हे दोघे बुरहानपूरच्या दिशेने रेल्वे रुळावरून चालत जात होते. या दरम्यान दोघांनीही हेडफोन घातले होते. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्या दोघांना धडक दिली. या घटनेनंतर ही ट्रेन जेव्हा लालबाग रेल्वे स्थानकात दाखल झाली तेव्हा ड्रायव्हरने याबाबत माहिती दिली. रेल्वे रुळावरून चालत जाणाऱ्या त्या दोन्ही तरूणांनी हॉर्न देऊनही आपला रस्ता बदलला नाही. त्यामुळे रेल्वेच्या धडकेने त्यांचा मृत्यू झाल्याचे ड्रायव्हरने सांगितले.

घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले असता त्यांना या दोन्ही तरूणांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे पहायला मिळाले. सलग दोन तास परिश्रम घेत त्यांच्या शरीराचे 50 ते 60 तुकडे पोलिसांनी जमा केले. सुमारे दोन तास या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. सायंकाळी सातनंतर हळूहळू रेल्वे रुळावरून धावू लागल्या.

आपली प्रतिक्रिया द्या