गुंदवली ते अंधेरी पश्चिम एकाच ट्रकवर दोन्ही दिशेकडील मेट्रो चालवल्याने प्रवाशांची रखडपट्टी

गुंदवली ते अंधेरी पश्चिम मेट्रो मार्गिकेवर बुधवारी सकाळी एका ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि या मार्गावरील मेट्रो सेवेचे वेळापत्रक काही काळ विस्कळीत झाले. तांत्रिक बिघाड झालेली ट्रेन मधेच थांबली होती. त्यामुळे ती ट्रेन तेथून दुरुस्तीसाठी नेईपर्यंत मेट्रो प्रशासनाने एकाच ट्रकवर दोन्ही दिशेकडील मेट्रो सेवा चालवली. यात प्रवाशांची रखडपट्टी झाली. बुधवारी सकाळी मेट्रो मार्गिका-9 वर झालेल्या ट्रायल रननंतर एक ट्रेन मेट्रो मार्गिका-7 कडे वळत होती. याचदरम्यान दहिसर-पूर्व येथील पॉइंट सेक्शनजवळ त्या ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे ती ट्रेन काही वेळासाठी त्याच जागी थांबली. त्या ट्रकवरील वाहतुकीवर परिणाम होणार असल्याचे लक्षात घेत मेट्रो प्रशासनाने दुसऱ्या ट्रकवर दोन्ही दिशेकडील मेट्रो सेवा सुरू ठेवली होती.