
सामना ऑनलाईन, मुंबई
नवे दरपत्रक लागू करण्यासाठी ‘ट्राय’ने दिलेली अंतिम मुदत आज मध्यरात्री संपली. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच केबलवरून पे चॅनेल्स हद्दपार झाली असून आजपासून ग्राहकांना फक्त फ्री चॅनेल्स पाहता येणार आहेत.
शिवसेनेची ‘कोडा’ ही केबल चालक संघटना हा तिढा सोडवण्यासाठी गेला महिनाभर प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नांना यशही मिळत आहे. ‘कोडा’चे अध्यक्ष, आमदार ऍड. अनिल परब यांनी यासंदर्भात आज माहिती दिली. ‘कोडा’ने ‘ट्राय’पुढे आपली भूमिका यशस्वीरीत्या मांडली. काही कंपन्यांनी तसेच ब्रॉडकास्टर्सनी केबलचालकांना देण्यात येणारा हिस्सा वाढवून देण्याची तयारी दर्शवली आहे. अन्य कंपन्याही त्या तयारीत आहेत, अशी माहिती आमदार परब यांनी दिली. गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.
केबलचालकांना आणखी आठ दिवसांची मुदतवाढ हवी
ब्रॉडकास्टर्स, एमएसओ आणि केबलचालक यांच्यामध्ये चर्चेची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. केबलचालकांच्या अनेक मागण्यांना ब्रॉडकास्टर्स आणि कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याला एक कायदेशीर स्वरुप प्राप्त झाले पाहिजे आणि त्यासाठी आणखी आठ दिवसांची वाढीव मुदत ‘ट्राय’ने द्यायला हवी असे आमदार परब यांनी सांगितले. ज्या केबलचालकांनी ग्राहकांकडून त्यांच्या पसंतीच्या वाहिन्यांची माहिती देणारे फॉर्म भरून घेतलेले नाहीत त्यांनी ते घ्यावेत आणि स्वतःकडेच ठेवावेत, कंपन्यांना देऊ नयेत असे आवाहनही यावेळी परब यांनी केले.































































