हे सरकार आहे की भुताटकी! ; मनपा आयुक्तांची सायंकाळी झालेली बदली मध्यरात्री रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेशी गद्दारी करून आलेले शिंदेफडणवीस सरकार म्हणजे भुताटकी असल्याचे प्रत्यंतर पदोपदी येत आहे. नांदेड मनपा आयुक्तांची सरकारने मंगळवारी सायंकाळी बदली केली. तसे आदेशही काढले. त्यांच्या जागेवर पनवेलच्या अतिरिक्त आयुक्तांची नियुक्तीही करण्यात आली. त्यानंतर काही तासांतच मध्यरात्री हे दोन्ही आदेश रद्द करण्यात आले.

नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या बदलीची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होती. अपेक्षेप्रमाणे मंगळवारी सायंकाळी डॉ. लहाने यांच्या बदलीचा सरकारी आदेश मनपात धडकला. डॉ. लहाने यांच्या जागी पनवेलच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची नियुक्ती करण्यात आली. आदेशानुसार डॉ. सुनील लहाने यांनी बाडबिस्तरा गुंडाळण्याची तयारी चालू केली असतानाच मध्यरात्री पुन्हा राजकीय काथ्याकुट झाला आणि डॉ. सुनील लहाने यांची परभणीकडे मार्गस्थ होणारी गाडी नांदेडात मुक्कामी थांबली. लहाने यांची बदली रद्द करण्यात आल्याचा आदेश मध्यरात्री काढण्यात आला. त्याचबरोबर तृप्ती सांडभोर यांची नांदेड येथे करण्यात आलेली नियुक्तीही दुसऱ्या आदेशाने रद्द करण्यात आली. त्यानंतर तृप्ती सांडभोर यांची नांदेडकडे निघालेली गाडी परभणीकडे वळवण्यात आली. सांडभोर यांना परभणी मनपाचे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात येत असल्याचा तिसरा आदेश मध्यरात्रीच जारी करण्यात आला.

शिंदे-फडणवीस सरकार आहे की भुताटकी असा प्रश्न यामुळे सर्वसामान्यांना पडला आहे. सायंकाळी करण्यात आलेली बदली मध्यरात्री रद्द करण्याची कर्तबगारी करणाऱ्या या सरकारने यानिमित्ताने स्वतःचेच हसे करून घेतले.