
उत्तर हिंदुस्थानात 35 वर्षांपूर्की घडलेल्या ट्रान्झिस्टर बॉम्बस्फोट प्रकरणातील एकूण 49 पैकी 30 आरोपींची न्यायालयाने सोमवारी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. दिल्लीतील बस आणि सार्वजनिक ठिकाणी तसेच उत्तर प्रदेश, हरयाणा या राज्यांतील दिल्लीला लागून असलेल्या भागांमध्ये 10 मे 1985 रोजी ट्रान्झिस्टरमध्ये पेरलेल्या बॉम्बचे स्फोट झाले होते. यात 49 नागरिकांचा बळी गेला आणि 127 लोक जखमी झाले होते.
ट्रान्झिस्टर बॉम्बस्फोट खटल्यात आठ तक्रारी, 14 आरोपपत्र, 1 हजार 399 साक्षीदार आणि 24 न्यायाधीशांचा सहभाग होता. आरोपींविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, सरकारविरुद्ध युद्ध छेडणे यांसह विविध आरोप ठेवले होते. या खटल्याची सुनावणी करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी पोलीस तपासात विविध उणिवा असल्याचे सरकारी वकिलांच्या लक्षात आणून दिले. केवळ जुजबी पुराव्यांकरून दीड दशकापूर्वीच्या या खटल्यात आरोपींना दोषी ठरविता येणार नाही, असेही न्यायाधीश यादव यांनी स्पष्ट केले
ट्रान्झिस्टर बॉम्बस्फोट खटला
- दिल्ली पोलिसांनी तत्कालीन डीसीपीच्या नेतृत्वात विशेष तपास पथकाची घोषणा केली होती. या पथकाने आरोपपत्रात 59 आरोपी नमूद केले. पैकी पाच कुख्यात गुन्हेगार असून ते खटल्यादरम्यान एकदाही न्यायालयात हजर झाले नाही.
- यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने जुलै 2006 मध्ये पाच आरोपींना अपुर्या पुराव्यामुळे आरोपमुक्त केले होते. उर्वरित 49 आरोपींपैकी 19 जणांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला, तर 30 आरोपी 1986 पासून जामिनावर आहेत.
- न्यायालयाने आपल्या 120 पानांच्या निकालात पोलिसांवर ताशेरे ओढले. यातील काही प्रकरणांत सरकारी साक्षीदार होते, मात्र ते हजर झाले नाहीत. या प्रकरणाचा तपास दोषपूर्ण, एकतर्फी, अनुचित आणि त्रुटीयुक्त आहे. अशा तपासाच्या बळावर आरोपींना दोषी सिद्ध केले जाऊ शकत नाही.
- बसमध्ये आढळलेले बॉम्ब हे आरोपींनीच पेरले होते का, या बॉम्बचा स्फोट झाला की नाही, स्फोट झाला नसेल तर ते निष्क्रिय केले की नाहीत हे पोलीस सिद्ध करू शकले नाहीत, असे महत्त्वाचे निरीक्षणही नोंदवित सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी 30 आरोपींची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली.



























































