
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
मध्यवर्ती बसस्थानकातून अलिबाग, कोल्हापूर, अकोला जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रथमच शिवशाही बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता नव्या कोऱ्या शिवशाहीतून प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
खासगी बसच्या तुलनेत एसटी महामंडळ मागे पडू नये म्हणून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी शिवशाही बसगाड्या सुरू केल्या आहेत. महामंडळाच्या या शिवशाही बस अल्पावधीतच लोकप्रिय ठरत आहेत. प्रवाशांना अतिशय माफक दरामध्ये वातानुकुलित प्रवास घडवणाऱ्या शिवशाहीला दिवसेंदिवस प्रवाशांची मागणी वाढत आहे. संभाजीनगर मध्यवर्ती आगारातून सोळा महामंडळाच्या आणि आठ खासगी अशा एकूण २४ बसगाड्या वेगवेगळ्या मार्गांवर प्रवाशांना घेऊन धावत आहेत.
दरम्यान, प्रवाशांच्या मागणीनुसार अलिबाग, कोल्हापूर, अकोला आणि नाशिक मार्गावर शिवशाही बस नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत. संभाजीनगर-अलिबाग बस सकाळी ७.४५ वाजता मध्यवर्ती बसस्थानकावरून सुटणार आहे. तर अलिबाग-संभाजीनगर ही सकाळी ९.३० वाजता अलिबाग येथून संभाजीनगरकडे निघणार आहे. संभाजीनगर-कोल्हापूर सकाळी ६.१५ वाजता आणि परतीला कोल्हापूर संभाजीनगर ६.१५ वाजता निघणार आहे. नाशिकसाठी पूर्वी दहा फेऱ्या होत्या. आता दोन फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यात सकाळी ६.१५ आणि दुपारी ४.०० अशा दोन शिवशाही वाढवण्यात आल्या आहेत. याशिवाय अकोला जाण्यासाठी दररोज १२.३० वाजता शिवशाही बस सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.































































