आचरा समुद्रात ट्रॉलर बुडाला, 17 खलाशांना वाचवण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

समुद्रात मासेमारी करून परतत असताना आचरा पिरावाडी समुद्र-खाडी नस्तानजीक समुद्रात एक ट्रॉलर बुडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रॉलरवरील 17 खलाशांना अन्य बोटीने दोरीच्या साहाय्याने किनार्‍यावर सुखरूप आणण्यात आले. तर दहा तासांच्या अथक परिश्रमानंतर सकाळी हा ट्रॉलर किनार्‍यावर आणण्यात यश आले. हडी येथील रियान अझीज शेख यांच्या मालकीचा या ट्रॉलर असून या अपघातात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या ट्रॉलरला ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करण्याचा परवाना असताना ट्रॉलरचा वापर पर्ससीन मासेमारीसाठी होत होता असा आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला असून मत्स्यव्यवसाय विभागाने सखोल चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.

गेले काही दिवस समुद्रात किमती मासळी मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे हडी येथील रियान शेख यांच्या मालकीचा ट्रॉलर गेले दोन दिवस समुद्रात मासेमारीसाठी गेला होता. मध्यरात्री हा ट्रॉलर मासेमारी करून परतत असताना आचरा पिरावाडी येथील समुद्रात नस्तानजीक ओहोटी व गाळामुळे पाण्याच्या तळाला आदळून कलंडला. ट्रॉलरवर मासळी व जाळी असल्याने समुद्राचे पाणी आत घुसल्याने तो उलटला.

ट्रॉलरवरील खलाशांनी याची माहिती किनार्‍यावरील सहकार्‍यांना दिली. त्यानुसार रियान मुजावर, किशोर तोडणकर, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, आसिफ मुजावर, फिरोज मुजावर, बुधाजी पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह पिरावाडी, जामडूल, हिर्लेवाडी येथील ग्रामस्थांनी किनार्‍यावर धाव घेतली. यातील काहींनी दोरीच्या साहाय्याने ट्रॉलरवरील सतरा खलाशांना बाहेर काढले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मध्यरात्रीपासून हा ट्रॉलर वाचविण्यासाठी मच्छीमारांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा ट्रॉलर किनार्‍यावर काढण्यात यश मिळाले. यात ट्रॉलरचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अक्षय धेंडे, फरांदे यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली. मत्स्यव्यवसायचे अधिकारी मात्र घटनास्थळी दाखल झाले नसल्याचे बोलले जात होते.

गाळ उपसा व्हावा

आचरा येथे समुद्र व खाडी नस्तावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे मासेमारी बोटी ओहोटीच्या वेळी समुद्रात जाताना व खाडीत येताना अडचणी येतात. तसेच अपघाताची स्थितीही निर्माण होते. यासाठी तातडीने गाळ उपसा करावा अशी मागणी आचरा माजी सरपंच मंगेश टेमकर यांनी केली आहे.