वृक्षसंवर्धनाचे आव्हान

221

>> अभय मोकाशी

‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संकल्प फक्त आपल्या राज्यात अथवा हिंदुस्थानातच आहे असे नाही. संयुक्त राष्ट्रानेदेखील हा कार्यक्रम हाती घेतला आहे. युनायटेड नेशन्स इन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (युनेप) या संस्थेने 2008 साली जगभरात एक अब्ज झाडे लावण्याचा संकल्प केला आणि त्यात 166 देशांनी भाग घेतला. जगातील विविध सरकारं आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने त्या वर्षी तीन कोटी झाडं लावण्यात आली आणि तो संकल्प अजून पाळला जात आहे.

झाडांमुळे जमीन आणि त्यातील पाण्याचा बचाव होतो, हिमस्खलनावर नियंत्रण ठेवले जाते, वाळवंट होण्यापासून बचाव होतो, हवेतील कार्बनडाय ऑक्साइड शोषला जातो, समुद्रकिनाऱयाच्या जमिनीचे संरक्षण होते, तसेच पावसाच्या प्रक्रियेत झाडांचा फार मोठा उपयोग होतो याची जाणीव युनेपने करून दिली. झाडांमुळे पृथ्वीवर उष्णता निर्माण करणारे ग्रीनहाऊस वायू शोषले जातात. झाडांमुळे आपल्याला प्राणवायू मिळतो हे विसरता येणार नाही.
बीबीसीच्या सायन्स फोकस या नियतकालिकेत आपल्याला झाडांपासून होणाऱया आणखी एका लाभाचा उल्लेख करण्यात आला आहे. झाडं जमिनीत ओलावा आणतात आणि जमिनीला थंड ठेवतात. एक मोठं झाड वर्षाला 150 टन पाणी जमिनीतून वातावरणात पाठवते आणि तेच पाणी पावसाच्या रूपात परत पृथ्वीवर येते. ‘युनायटेड नेशन्स इंटर-गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’च्या अलीकडच्या अहवालानुसार 2030पर्यंत औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या तुलनेत जगभरातील वातावरणात 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढ होणार आहे. त्याच अहवालात म्हटले आहे की, इसवी सन 1800पासून मनुष्यजातीने वातावरणात 300 गिगाटन कार्बनची भर केली आहे आणि हा कार्बन जर दोन तृतीयांशाने जरी कमी करायचा असेल तर अजून एक अब्ज हेक्टर जंगलाची गरज आहे.

झुरिक येथील स्वीझ फेडेरल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पर्यावरणशास्त्रज्ञ जीन-फ्रँकोइस बास्टिन आणि टॉम क्रोथर यांनी पृथ्वीवर इतक्या जमिनीवर झाडांची लागवड होऊ शकते का याचा अभ्यास करण्याचे ठरविले आणि त्यासाठी त्यांनी पृथ्वीवरील सध्याच्या जंगलांची उपग्रहाद्वारे घेतलेली 80,000 छायाचित्रे तपासली. त्यांनी जमीन आणि वातावरण याच्या आधारावर 10 गट बनविले. त्यांनतर नवीन लागवड करण्यासाठी मोकळी जमीन किती आहे याचा अभ्यास केला आणि ते अशा निष्कर्षाला पोहोचले की, फक्त 90 कोटी हेक्टर जमिनीवर नवीन झाडे लावता येतील. एकीकडे झाडे लावण्याची मोहीम चालू आहे तर वेगवेगळ्या कारणांमुळे जगातील झाडांची संख्या मोठय़ा प्रमाणात घटत चालली आहे. अमेरिकेच्या मेरीलॅण्ड विद्यापीठाच्या एका पहाणीनुसार 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये जगभरात 51 टक्के अधिक हिरवळीची नासाडी झाली. विकास, शेती, शहरीकरण, आगी, लाकडाला वाढती मागणी अशा अनेक कारणांमुळे जगात झाडांची संख्या घटत आहे.

जंगलात आगी लागण्याच्या घटना वाढत आहेत. अशा आगी लागण्याची अनेक कारणं आहेत, पण त्यात सर्वात मोठे कारण म्हणजे मनुष्य. वर्ल्ड ऍटलास या संकेतस्थळाचा दावा आहे की, अमेरिकेतील जंगलातील 90 टक्के आगी माणसांमुळे म्हणजेच त्यांच्या निष्काळजीपणामुळे लागतात. ‘नेचर’ मॅगझिनच्या लेखात राजा लॉकी लिहितात की, झाडांच्या अभावी जमीन तापेल आणि कोरडी होईल, ज्यामुळे सुकलेलं लाकूड पेटून जंगलात मोठय़ा आगी लागतील. अशा आगीने निर्माण होणारी काजळी सूर्याला झाकेल, ज्याने अनेक वर्षे चांगले पीक येणार नाही. पृथ्वीवरील वातावरणातील बदल अनेक कारणाने होत आहे. त्यातील एक कारण म्हणजे झाडांची कमी होत असलेली संख्या.

आज जगात किती झाडं आहेत असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. नेचर या नियतकालिकेने प्रसिद्ध केलेल्या एका लेखात म्हटले आहे की, भूतलावर 3004 कोटी झाडं आहेत, पण 11,000 वर्षांपूर्वी ही संख्या 6000 कोटी होती. त्याच लेखात पुढे लिहिले आहे की, आज दरडोई 422 झाडं आहेत आणि पुढील 150 वर्षांत ही संख्या 214 असेल. वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढत असल्यामुळे जगभरात तापमानात वाढ होत आहे, ज्यामुळे पावसावर परिणाम होत आहे, तसेच उत्तर ध्रुवावरील बर्फ वितळू लागला आहे, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे आणि समुद्रकिनारच्या अनेक गावांना तसेच वस्त्यांना धोका निर्माण झाला आहे. आता प्रश्न उरतो तो आरे कॉलनीतील वृक्षतोडीचा. एका रात्रीत दोन हजार मोठी झाडं तोडली हा एक उच्चांक समजायला हवा. या वृक्षतोडीचा पर्यावरणावर काय परिणाम होईल हे काळ ठरवेल. मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणाऱयांना वातावरणातील आणि तापमानातील बदल जाणवले असतील. या उपनगरात मोठय़ा प्रमाणात इमारती उभ्या राहात आहेत आणि त्यासाठी कित्येक झाडं तोडण्यात आली आहेत. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी रस्त्याने जाताना, अंधेरी पार केल्यावर हवेत थोडा गारवा जाणवत असे. त्यानंतर गोरेगावच्या आरे कॉलनीजवळ तापमानात फरक जाणवायचा आणि पुढे गेल्यावर बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात अधिक गारवा जाणवायचा. आता हा फरक कमी होत चालला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनी मनात आणले तर चांगल्याप्रकारे वृक्ष लागवड होऊ शकते हे एनटीपीसीने दाखवून दिले आहे. जेथे जेथे एनटीपीसी ऊर्जानिर्मिती करते तेथे तेथे या कंपनीने मोठय़ा प्रमाणात झाडं लावून एक आदर्श घडविला आहे. ज्या वेगाने झाडं तोडली जात आहेत त्यामुळे असे वाटते की, तुकाराम महाराजांनी रचलेला अभंग ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरीं वनचरें, पक्षी ही सुस्वरें आळविती’ हे फक्त ग्रंथातच राहील.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या