सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धा – त्रिशा-गायत्रीला सलग दुसरा किताब

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंना आनंद आणि निराशा अशा दोन्ही अनुभूतींना सामोरे जावे लागले.  त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या हिंदुस्थानी जोडीने प्रभावी कामगिरी करत सलग दुसऱया वर्षी महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले, मात्र पुरुष एकेरीत हिंदुस्थानच्या किदाम्बी श्रीकांतची आठ वर्षांपासूनची किताबाची प्रतीक्षा यंदाही संपली नाही. त्याला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

श्रीकांतला जेतेपदाची हुलकावणी

किदाम्बी श्रीकांतने 2017 च्या फ्रेंच ओपननंतर कोणताही किताब जिंकलेला नाही. लखनौ येथील या अंतिम सामन्यातही तो विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता, मात्र हाँगकाँगच्या जागतिक क्रमवारीत 59व्या स्थानी असलेल्या जेसन गुनावन याने 67 मिनिटांच्या थरारक लढतीत श्रीकांतला 16-21, 21-8, 20-22 असे हरवून जेतेपदावर नाव कोरले. पहिल्या गेममध्ये गुनावनने आक्रमक खेळ करत आघाडी घेतली. दुसर्या गेममध्ये मात्र श्रीकांत जबरदस्त लयीत दिसला आणि तब्बल 13 गेम पॉइंट घेत सामना 1-1 असा केला. निर्णायक गेममध्ये श्रीकांतने 5-1 अशी सुरुवातीची आघाडी घेतली होती, पण गुनावनने उत्कृष्ट रिट्रीव्हल आणि जोरदार स्ट्रोक्सच्या बळावर सामना फिरवला. अखेरीस श्रीकांतचा शेवटचा शॉट रेषेबाहेर गेला आणि त्याला किताबाने हुलकावणी दिली.

त्रिशागायत्री जोरदार

महिला दुहेरीचा अंतिम सामना सुरुवातीपासूनच वेगवान आणि रोमांचक होता. जपानच्या काहो ओसावा आणि माई तनाबे यांनी पहिला गेम 21-17 असा जिंकत जोरदार सुरुवात केली, मात्र त्यानंतर हिंदुस्थानी जोडीने अचूक आक्रमण, स्मार्ट नेट प्ले आणि उत्तम समन्वय दाखवत सामना आपल्या बाजूने वळवला. दुसऱया गेममध्ये त्रिशा-गायत्री जोडीने 9-2 अशी मजबूत आघाडी घेत 21-13 असा जिंकत सामना निर्णायक गेममध्ये नेला. तिसऱया गेममध्ये काही चुका झाल्यामुळे फरक कमी झाला. तरीही त्रिशाचा झपाटय़ाचा नेट प्ले आणि गायत्रीचे घणाघाती स्मॅशेसमुळे हिंदुस्थानी जोडीने सलग दुसऱया किताबाला गवसणी घातली.