डहाणू दिवसभरात सातवेळा हादरले; भूकंपाचे धक्के थांबेनात

41

सामना ऑनलाईन,पालघर

डहाणूत गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेला थरथराट अद्यापि थांबलेला नाही. आज एकाच दिवशी सातवेळा भूकंप झाल्याने धक्क्यावर धक्के बसले. पुन्हा पळापळ.. जिवाच्या आकांताने धावणे.. आणि तोच गूढ आवाज. धुंदलवाडीच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी वेळीच धूम ठोकल्याने ते बचावले. ‘भय इथले संपत नाही’ अशी स्थिती निर्माण झाली असून नैसर्गिक आपत्तीमुळे डहाणू, तलासरीतील आदिवासी पाडय़ांवरील रहिवाशांची झोप उडाली आहे. अनेक घरांना भेगा पडल्या असून काही घरे तर कोसळण्याच्या स्थितीत आहेत.

सततच्या भूकंपामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला धास्तावल्या असून त्यांच्या रोजगारावरदेखील परिणाम झाला आहे. आज सकाळी  10.44 मिनिटांनी 3.1 रिश्टर स्केलचा पहिला धक्का बसला. त्यानंतर दिवसभरात सातवेळा लहान-मोठे धक्के बसल्याने धुंदलवाडीतील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सततच्या भूकंपामुळे ग्रामस्थांना या धक्क्यांची सवय झाली असली तरी हा थरथराट आता जिवावर उठू लागल्याने येथील पूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले आहे. आजच्या धक्क्याची माहिती दिल्लीमधील सिस्मॉलॉजी विभागाला देण्यात आली आहे.

कायमस्वरूपी भूकंप मापनयंत्र

सध्या पालघरमध्ये पाच ठिकाणी भूकंपशोधन यंत्रे बसवली आहेत. मात्र ती तात्पुरत्या स्वरूपाची असून लवकरच अत्याधुनिक कायमस्वरूपाचे यंत्र बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी हैदराबाद येथील नॅशनल जिऑग्राफीक रिसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेशी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी चर्चा केली असून संस्थेचे पदाधिकारी याबाबतचा अहवाल सादर करणार आहेत.

कापडाच्या तंबूत शाळा

डहाणूतील धुंदलवाडी या भूकंपामुळे प्रकाशझोतात आली असून आश्रमशाळेमधील वर्गखोली पडल्याने विद्यार्थी कापडाच्या तंबूमध्ये शिक्षण घेत आहेत. तंबू हीच शाळा झाली असून सतत होणाऱ्या भूकंपामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे. हा थरथराट असाच सुरू राहिल्यास ऐन परीक्षेच्या काळात आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. मात्र मुलांनो, घाबरू नका. अभ्यासाकडे लक्ष द्या. शिवसेना तुमच्या पाठीशी राहील असा दिलासा त्यांना दिला.

शिवसेनेची ‘मदत छावणी’

डहाणूतील भूकंपग्रस्तांच्या हाकेला शिवसेना धावली असून शिवसेना नेते व आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने खास ‘मदत छावणी’ उभारली आहे. त्यांच्या हस्ते गरजूंना ब्लँकेट, ताडपत्री तसेच तंबूंचे वाटप करण्यात आले. त्याशिवाय महिन्याभराचे धान्यदेखील भूकंपग्रस्त कुटुंबीयांना दिले असून त्यांच्या आरोग्याचीदेखील काळजी घेण्यात येणार आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून येथील गावपाडय़ांवर भूकंपाची जबरदस्त दहशत निर्माण झाली असून सरकारने केवळ यंत्र बसवण्यापलीकडे काहीही केलेले नाही.  आम्हाला कोरडा दिलासा नको.. मदत करा, असा टाहो फोडत असतानाच त्यांच्या मदतीला शिवसेना आली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज भूकंपग्रस्त भागाला भेट दिली. ग्रामस्थांना रात्रीच्या जेवणाची सोय उपलब्ध करून दिली असून धुंदलवाडी परिसरातील हळदपाडा, वाधण, पाटीलपाडा, तोरलीपाडा, हिंबडपाडा येथील पाचशेहून अधिक रहिवाशांना तांदूळ, डाळ, साखर, तेल, मीठ आदी जीवनावश्यक वस्तू दिल्या. त्याशिवाय प्रत्येक कुटुंबाला दोन ब्लँकेटचे वाटप केले तसेच तंबूंचीदेखील व्यवस्था केली. यावेळी पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, आमदार अमित घोडा, सहसंपर्कप्रमुख केतन पाटील, लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा, जिल्हाप्रमुख राजेश शहा,  वसंत चव्हाण, प्रभाकर राऊळ, युवासेना विस्तारक राहुल लोंढे आदी उपस्थित होते.

… आणि थरथराटाचा अनुभव घेतला

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आज धुंदलवाडी परिसरात भूकंपग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आले असतानाच त्यांनी स्वतः भूकंपाचा धक्का अनुभवला. अचानक झालेल्या गूढ आवाजाने उपस्थितांमध्ये एकच थरकाप निर्माण झाला.

आपली प्रतिक्रिया द्या